गुन्हे वार्ता

नंदुरबारमध्ये गुटखा विक्रेत्यांवर कारवाईचा फास; ‘अन्न व औषधी’च्या धाडी; दोन दुकानदारांवर गुन्हा, ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त!

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : ‘यत्र, तत्र, सर्वत्र’ खुलेआम गुटखा विक्री करणाऱ्यांच्या गळ्याभोवती अन्न व औषधी प्रशासन विभागाने कारवाईचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत पहिल्याच दिवशी नंदुरबार शहरातील दोन दुकानांवर धाडी टाकून, तब्बल ६७ हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला. या दोन्ही दुकानांच्या मालकांवर नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात मानवी शरीरास अपायकारक पदार्थ विकल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरात बहुतांश ठिकाणी खुलेआम गुटख्याची विक्री सुरू असल्याची माहिती अन्न व औषधी प्रशासन विभागाला मिळाली होती. त्यानुसार गोपनीय माहितीच्या आधारे सर्वात आधी ‘अन्न व औषधी’चे पथक शहरातील मंगळ बाजार भागात दीड वाजेच्या सुमारास पोहोचले. या ठिकाणी पथकाने हनुमान व्यायाम शाळेजवळील सीमा किराणा या दुकानावर छापा टाकला. पथकाने तपासणी केली असता दुकानात गुटख्याचा (सुगंधित तंबाखू) प्रचंड साठा सापडला. अन्न व औषधी प्रशासनाच्या पथकाने तब्बल ५८ हजार ७२६ रुपये किमतीचा हा हानिकारक साठा जप्त केला. यात विमल, तानसेन फ्लेवर, राजनिवास, बाहुबली, राजश्री, करमचंद, युवा गोल्ड, बागबान, वाणी प्रीमियम आदी पानमसाला आणि त्याच्यासोबत मिश्रणासाठी दिली जाणारी सुगंधित तंबाखू आदींचा समावेश आहे. याप्रकरणी दुकान मालक जावेद रजाक खाटीक (रा. गाझीनगर, मशिदीजवळ, नंदुरबार) याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसरी कारवाई अवघ्या १५ मिनिटांच्या अंतराने याच परिसरातील गंगासागर प्रोव्हिजन्स या दुकानावर करण्यात आली. या ठिकाणी देखील ‘अन्न व औषधी’ प्रशासनाच्या पथकाला ८ हजार ५२० रुपयांचा विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा आढळला. या प्रकरणात योगेश रमण मराठे (रा. मराठा गल्ली, नंदुरबार) याच्या विरोधात प्रतिबंधित गुटखा विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या दोन्ही प्रकरणात अन्न व औषधी प्रशासनाचे अन्नसुरक्षा अधिकारी तुषार किशोर देवरे यांनी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या दोन्ही प्रकरणात सध्या उपनिरीक्षक भुनेश मराठे व छगन चव्हाण अधिक तपास करीत आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button