नंदुरबार जिल्हा

शहादा न.प.च्‍या सभेत सभापतींनीच भिरकावली नगराध्यक्षांच्या दिशेने काळीपट्टी; सभेत कधी तणाव तर कधी हलकीफुलकी चर्चा, ६४ पैकी १० विषय नामंजूर!

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : शहादा नगर परिषदेची तिसरी सर्वसाधारण सभा शुक्रवारी (दि. १७) पालिकेच्या सभागृहात पार पडली. नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत विषय पत्रिकेवरील एकूण ६४ विषयांपैकी १० विषय नामंजूर अथवा स्थगित करण्यात आले, तर उर्वरित ५४ विषयांना बहुमताने मंजुरी देण्यात आली. ही सभा कधी तणावपूर्ण तर कधी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
सभेच्या प्रारंभापासूनच वातावरण तापलेले होते. बांधकाम सभापती संतोष वाल्हे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत आपला निषेध नोंदवला. त्यांनी नगराध्यक्षांच्या दिशेने काळीपट्टी भिरकावून आपला संताप व्यक्त केला. मात्र, नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांनी अत्यंत शांत व संयमी भूमिका घेत सभेचे कामकाज पुढे सुरू ठेवले.
हे विषय झाले नामंजूर किंवा स्थगित
सभेत चर्चेअंती १० विषय फेटाळण्यात आले किंवा पुढील बैठकीपर्यंत स्थगित ठेवण्यात आले. यात खा. गोवाल पाडवी यांनी सुचविलेल्या शाळा क्र. ५ मधील भौतिक सुविधा, पालिकेच्या अभिलेख विभागातील दप्तर वर्गीकरण, जुने मंगळ बाजार येथील अहुजा मेडिकल व नहाटा स्टोर्स जागेतील बांधकाम, आरक्षण क्र. २१ वरील गाळेधारकांना मुदतवाढ व लोखंडी जिना तयार करणे, जुन्या भाजी मार्केटच्या जागेवर सुसज्ज संकुल बांधणे, स्वच्छता विभागासाठी खुर्ची खरेदी व विविध साहित्यासाठी ठेकेदारास मुदतवाढ, कुकडेल शिवार सर्वे नं. २४६ मधील जागेवर कंपाऊंड करणे या विषयांचा समावेश होता.
प्रशासकीय कामकाजावर ताशेरे
आरोग्य सभापती सुनील पाटील यांनी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी वेळेवर व योग्य माहिती देत नसल्याची तक्रार केली. तसेच, वाचनालयातील ८० पैकी ६० खुर्च्या नक्की कुठे गेल्या, असा प्रश्न उपस्थित झाल्याने सभागृहात मोठी चर्चा झाली. पालिकेचे काही कर्मचारी स्वतःच विविध विभागांची कंत्राटी कामे घेत असल्याचे उघडकीस आल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
नामकरणाचे प्रस्ताव
आयत्या वेळच्या विषयात मुनेशचंद्र जगदेव यांनी नगरपालिकेचे नाव ‘शहादा-कुकडेल नगर परिषद’ करण्याची मागणी केली. तर स्वीकृत नगरसेवक कल्पेश पटेल यांनी डोंगरगाव रस्त्यास ‘स्वामीनारायण मार्ग’ असे नाव देण्याचा प्रस्ताव मांडला.
यावेळी व्यासपीठावर उपनगराध्यक्ष माधवी मकरंद पाटील, मुख्याधिकारी साजिद पिंजारी उपस्थित होते. सर्व माहिती अद्ययावत ठेवावी आणि नगरसेवकांच्या प्रश्नांना कायदेशीर व व्यवस्थित उत्तरे द्यावीत, अशी ताकीद यावेळी उपनगराध्यक्षांनी अधिकाऱ्यांना दिली. नगराध्यक्षांनीही सर्व विभाग प्रमुखांना परिपूर्ण माहिती सभागृहास उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.
या चर्चेत ज्ञानेश्वर चौधरी, ललित छाजेड, सागर मराठे, प्रदीप ठाकरे, दीपक कोळी, वसीम तेली, एड. दानिश पठाण यांनी सहभाग नोंदवला. सभेचे सूत्रसंचालन कार्यालय अधीक्षक दिलीप वसावे यांनी केले, तर आभार मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी मानले.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button