कार, दुचाकीच्या डिकीत दडवली होती बिबट्याची कातडी, वनविभागाने केला तस्करीचा पर्दाफाश; ५ जणांना रंगेहात पडकले, नवापूर एमआयडीसीत धडक कारवाई

नवापूर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : कार आणि दुचाकींच्या डिकीत भरून सुरू असलेल्या बिबट्यांच्या कातडीच्या तस्करीचा नवापुरात वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो (मुंबई) आणि नंदुरबार वनविभागाने संयुक्त धडक कारवाई करीत पर्दाफाश केला. या धडाकेबाज कारवाईत पाच जणांच्या टोळीला बेड्या ठोकण्यात आल्या. ही कारवाई नवापूर एमआयडीसी परिसरात १५ एप्रिल रोजी सापळा रचून करण्यात आली.
वनविभागातील वरिष्ठ अधिकार्यांना नवापूर एमआयडीसी परिसरातून काही वाहनांतून बिबट्यांच्या कातडीची तस्करी सुरू असल्याची गुप्त माहिती खबर्यांकडून मिळाली होती. यानंतर सहायक वनसंरक्षक रोशन बुवा यांना आणि धुळे वनसंरक्षक नीनू सोमराज यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार, चिंचपाडा, नवापूर प्रादेशिक तसेच रोजगार हमी योजनेच्या पथकांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही कारवाई केली. संशयित आरोपी घटनास्थळी येताच पथकाने झडप घालत त्यांना ताब्यात घेतले.
जालमसिंग वत्या गावीत (रा. पाटी बेडकी, ता. नवापूर), रंजीतभाई बापूभाई गामीत (रा. झरणपाडा, ता. तापी, गुजरात), उमेश रामा गावित (रा. माचाहोंडा, ता. नवापूर), दिनेश गोबजी गावित (रा. झरणपाडा, गुजरात) व गुराजी भाद्या गावीत (रा. बोरपाडा, ता. नवापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
या कारवाईदरम्यान आरोपींकडून तुकड्यांच्या स्वरूपातील बिबट्याची कातडी जप्त करण्यात आली. तसेच तस्करीसाठी वापरलेली पांढऱ्या रंगाची मारुती स्विफ्ट कार (जीजे २६ ए १५१३) आणि तीन दुचाकी वाहनेही ताब्यात घेण्यात आली.
या प्रकरणी वडकळंबी येथील वनपालांनी वन कायद्यानुसार गुन्हा नोंदवला असून, सर्व आरेपींना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर करण्यात आले. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.



