नंदुरबार जिल्हा

‘पोरं पळवणारे आले’च्‍या अफवेतून राडा; मुलीच्या वडिलांसह तिघांवर जमावाचा हल्लाबोल; तुफान मारहाणीसह गाडीही पेटवली, तळोद्याच्या आमलाडनजीकची धक्कादायक घटना!

तळोदा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : ‘गावात पोरं पळविणारी टोळी आली आहे. ते सहा वर्षीय बालिकेला पळवून नेत आहेत’, अशा अफवेतून जमावाने संबंधित वाहन अडवून त्यातील तिघांना तुफान मारहाण केल्याची धक्कादायक घटना तळोदा तालुक्यातील आमलाड परिसरात घडली. जमावाने एवढ्यावरच न थांबता संबंधित चारचाकी वाहनही पेटवून दिले. विशेष म्हणजे मारहाण करण्यात आलेल्यांमध्ये मुलीच्या वडिलांसह त्यांच्या दोन मित्रांचा समावेश आहे. दरम्यान, गैरसमजुतीतून घडलेल्या या घटनेमुळे परिसरात बराच वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून तिघांनाही सुरक्षित स्थळी हलवल्याने मोठा अनर्थ टळला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्कलकुवा तालुक्यातील भगदरी येथील हिम्मत तिजा तडवी हे दोन मित्रांसह आमलाड परिसरातील मोड पुनर्वसन येथे राहणाऱ्या आपल्या सहा वर्षीय मुलीला भेटण्यासाठी बोलेरो गाडी घेऊन आले होते. ही मुलगी आई मालतीबाई सोबत या ठिकाणी राहत होती. मुलीला भेटल्यानंतर हिम्मत तडवी तिला गाडीत बसून पुन्हा गावी परत निघाले.
आईचा गैरसमज आणि राडा
हिम्मत तडवी व त्यांचे दोन मित्र मुलीसह निघताच मालतीबाई या ठिकाणी पोहोचल्या. मुलगी वडिलांसोबत जात असल्याचे न कळल्याने त्यांना आपल्या मुलीला कुणीतरी पळवून नेत असल्याचा गैरसमज झाला. यामुळे कोणताही विचार न करता मुले पळविणारी टोळी आपल्या मुलीला घेऊन जात असल्याची आरडाओरड सुरू केली. यामुळे गावकरी जमा झाले आणि त्यातील काही तरुणांनी पुढे निघालेल्या बोलेरो वाहनाचा पाठलाग सुरू केला. तोपर्यंत बोलेरो वाहन गावाबाहेर पोहोचले होते. तरुणांनी या गाडीचा पाठलाग करून गावाबाहेर दुचाकी आडवी लावून ती गाडी अडवली. तोपर्यंत गावकरीही तेथे पोहोचले. या सर्वांनी हिम्मत तडवी व त्यांच्या दोन मित्रांना गाडीतून उतरवून घेत त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार सुरू केला. अचानक हा प्रकार घडल्याने ते तिघेही गोंधळून गेले आणि त्यांना गावकऱ्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देता आले नाहीत. यामुळे गावकऱ्यांचा संताप वाढला आणि त्यांनी त्या तिघांनाही मारहाण सुरू केली. एवढ्यावरच न थांबता बोलेरोची तोडफोड करीत ते वाहन पेटवून दिले.
याच दरम्यान काही जणांनी तळोदा पोलिसांना घडत असलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून परिस्थितीची पाहणी केली. गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांची समजूत काढली. यामुळे काही अंशी तणाव निवळला. यानंतर पोलिसांनी सदर मुलीला पुन्हा आईच्या घरी नेले. तर गावकऱ्यांच्या मारहाणीत जखमी झालेल्या तिघांनाही तातडीने तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी वेळीच दखल घेतल्याने गावकऱ्यांच्या तावडीत सापडलेल्या या तिघांचा जीव वाचल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, ही सर्व घटना गैरसमजुतीतून घडली असून, तळोदा शहर व तालुकाच नव्हे तर जिल्हाभरातील १७ पोलिस ठाण्याच्या हद्दीत कुठेही मुले पळविणारी टोळी कार्यरत नसल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजन मोरे यांच्याकडून देण्यात आली. या घटनेची चर्चा दिवसभर अवघा तालुकाभर सुरू होती.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button