नवापूर तालुक्यात भटक्या कुत्र्यांचा हैदोस; लहान मुले हेरून सहा जणांच्या शरीराचे तोडले लचके, एका चिमुकल्याची प्रकृती चिंताजनक!

नवापूर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नवापूर तालुक्यातील मोगराणी – नावली परिसरात शुक्रवारी (दि. १७) संध्याकाळी उशिरा भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः हैदोस घातला. या कुत्र्यांनी विशेषतः लहान मुलांना टार्गेट करत तब्बल सहा जणांना चावा घेतला. या सर्वांनाच गंभीर दुखापती झाल्या असून, त्यापैकी एका चार वर्षीय चिमुकल्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, भटक्या कुत्र्यांच्या टोळीने घातलेल्या धुमाकूळानंतर मोगराणी – नावली परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोगराणी परिसरात शुक्रवारी संध्याकाळी भटक्या कुत्र्यांची झुंड सावजांच्या शोधात निघाली होती. याच दरम्यान ऋषी नावाचा चार वर्षीय चिमुकला आईसोबत शेतात गेला होता. त्याची आई बाजूला जाताच कुत्र्यांनी ऋषी एकटा असल्याचे पाहून त्याच्यावर झडप घालून त्याचे लचके तोडले. यामुळे ऋषी जोरदार ओरडू लागला. त्याच्या किंकाळ्या ऐकून त्याची आई धावत आली आणि तिने कुत्र्यांना विटाळून लावले. यात ऋषीचा जीव वाचला असला तरी कुत्र्यांनी घेतलेल्या चाव्यामुळे त्याच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या आहेत.
ऋषीच्या आईने पिटाळलेल्या कुत्र्यांच्या टोळीने नंतर याच परिसरात आणखी पाच जणांना लक्ष केले. यात क्रिश दिलीप गावित (९, रा. ढवळीपाडा), श्रेयस अनिल पाडवी (९, रा. मोगराणी), हितेश कृष्णा प्रधान (३, रा. नावली), दिया विनोद कोकणी (४.५, रा. मोगराणी), सुकरीबाई राजू कोकणी (५४, रा. मोगराणी) या सर्वांच्या शरीराचे लचके भटक्या कुत्र्यांनी तोडले.
दरम्यान सर्व जखमींना प्रारंभी खांडबारा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल कोकणी, अधिपरिचारिका मनिषा पवार, सुदाम वसावे यांनी जखमींवर उपचार केले. मात्र त्यांच्या शरीरावर झालेल्या जखमांची गंभीरता लक्षात घेत या सर्वांनाच पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.



