नंदुरबार जिल्हा

ब्रेकिंग न्यूज : चांदशैली येथे आज भल्‍या सकाळी भीषण अपघात; ट्रकने दुचाकीला उडवले, ब्राह्‍मणपुरीतील २७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : तालुक्यातील चांदशैली परिसरातील मित्तल जिनिंगजवळ आज, शनिवारी (दि. १८) सकाळी सुमारे नऊ वाजेच्‍या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मोटरसायकल आणि ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत हा अपघात झाला.
किरण शिवाजी पाटील (२७, रा. ब्राह्मणपुरी) असे या अपघातात दगावलेल्‍या तरुणाचे नाव असून, तो घटनास्थळीच ठार झाला. अपघात इतका भीषण होता की मोटरसायकलचा चक्काचूर झाला असून, परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ट्रकचा क्रमांक आरजे ११ जीए ८६६९ असा आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. मात्र, किरण पाटील यांना वाचविण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, किरण पाटील यांच्या निधनामुळे ब्राह्मणपुरी परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी आणि दोन वर्षांचा चिमुकला मुलगा असा परिवार आहे. कुटुंबाचा एकमेव आधारस्तंभ हरपल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातामुळे पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, वाहनचालकांनी वेगमर्यादा आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button