‘मी पुन्हा येईन’ म्हणत ते वारंवार येतात, पण वनविभागाला कधी दिसतच नाहीत!; शहाद्याच्या शिरूर कुकडेल शिवारात बिबट्यांचा धुमाकूळ; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहादा तालुक्यातील शिरूर कुकडेल शिवारात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून दोन बिबट्यांचा वावर वाढल्याने परिसरातील शेतकरी प्रचंड धास्तावले आहेत. शेतकरी हेमकांत बभुता पाटील यांच्या शेतातील विहिरीजवळ वारंवार बिबट्यांचे दर्शन होत असून, त्यामुळे त्यांच्या मनात शेतात जाण्याचीही भीती बसली आहे.
स्थानिक शेतकऱ्यांच्या माहितीनुसार, हे बिबटे रात्रीच्या वेळी शिवारात मुक्तपणे फिरताना दिसत असून काही वेळा दिवसाही बिबट्या दर्शन देत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. पिके काढणीला तयार असतानाच बिबट्यांच्या धुमाकूळामुळे शेतात जाण्यास मजूर तयार नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.
या संदर्भात शेतकरी हेमकांत पाटील म्हणाले की, “आमच्या शेतातील विहिरीजवळ दोन बिबटे सतत दिसत आहेत. आम्ही अनेक वेळा वनविभागाला कळवले, मात्र अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. ना कॅमेरे लावले, ना पिंजरा बसवला. अधिकारी फक्त रात्री येऊन पाहणी करून निघून जातात.”
परिसरातील इतर शेतकऱ्यांनीही वनविभागाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. “बिबट्यांचा वावर वाढत असताना योग्य ती खबरदारी घेतली जात नाही. त्यामुळे आमच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, शेतात उभे असलेले पिक काढण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. भीतीमुळे मजूर कामावर येण्यास टाळाटाळ करत असून, त्यामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांनी वनविभागाकडे तातडीने कॅमेरे बसवून बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, तसेच पिंजरा लावून बिबट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी केली आहे. यासोबतच शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.



