सावधान : वाढत्या उन्हाचे भयंकर साईड इफेक्ट्स; उष्माघातच नव्हे तर शरीरात मुतखडा, मूत्रमार्गात संसर्ग वाढण्याचाही धोका!

मुंबई (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : उष्णतेच्या लाटेत केवळ उष्माघाताचाच नव्हे तर मुतखडा (किडनी स्टोन) आणि मूत्रमार्गांत संसर्ग वाढीचाही धोका असल्याचा धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे. वाढत्या उन्हामुळे शरीराच्या निर्जलीकरणाचे (डिहायड्रेशन) प्रमाण वाढून त्यामुळे मुतखडा आणि मूत्रमार्गाशी संबंधित आजाराची प्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे ‘दि लँसेट’ या नियतकालिका प्रकाशित करण्यात आलेल्या एका संशोधनपर नमूद करण्यात आले आहे.
यंदा सूर्योदय कोपले असून, एप्रिलच्या मध्यावरच तापमानाचा पारा बहुतांश ठिकाणी ४० ते ४५ अंशांच्या घरात पोहोचला आहे. आतापर्यंत उष्माघाताने दोन बळीही घेतले असून, दिवसागणिक ऊन वाढत चालले आहे. भारतात वाढत चाललेल्या या उष्णतेच्या लाटेची दखल अमेरिकेच्या सिव्हिल डिफेन्स विभागाने घेतली आहे. उष्णतेच्या या लाटेमुळे मानवी शरीरावर घातक परिणाम होत असून, त्याच्या परिस्थितीने ‘ सायलेंट हेल्थ क्रायसिस’चे रूप धारण केले आहे. सध्याच्या वातावरणात माणसाला नेहमीचे सोडून इतरही काही गंभीर आजार होण्याची शक्यता या विभागातील व्यक्त केली आहे. उष्णतेच्या या लाटेत जगभरातील देशांमध्ये कोण कोणते विकार बळावत आहेत याचा अभ्यास सध्या शास्त्रज्ञांकडून सुरू आहे.
मूत्राशयाचे विकार
उन्हाळ्यात बहुतांशजण कमी पाणी पितात. अशा व्यक्तींच्या मूत्राशयातील हानिकारक जिवाणू शरीराबाहेर पडत नाहीत त्यामुळे मूत्रमार्गामध्ये संसर्ग होण्याची शक्यता बळावते. उष्ण आणि दमट वातावरण हे शरीरात राहिलेल्या या जिवाणूंच्या वाढीसाठी पोषक ठरते. यातून विशेषता महिला व वृद्धांमध्ये मूत्रमार्गांच्या संसर्गाचा विकार वाढीचे प्रमाण अधिक आढळत आहे, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
किडनीही धोक्यात
उष्णतेचे प्रमाण म्हणजेच तापमान वाढल्यावर शरीर थंड ठेवण्यासाठी नैसर्गिकरित्या घाम येतो. हा घाम शरीराबाहेर पडत असल्याने त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. त्यामुळे लघवी अधिक दाट होते आणि शरीरातील कॅल्शियम यूरिक ॲसिड आदी घटक किडनीमध्ये क्रिस्टल च्या स्वरूपात तसेच राहून साचू लागतात. याचेच रूपांतर पुढे मुतखड्यामध्ये होते आणि सध्याच्या वाढत्या उष्म्यामुळे हे प्रमाण वाढत असल्याचा धोका शास्त्रज्ञांनी नमूद केला आहे.
ही घ्या काळजी…
* दररोज किमान दहा ते बारा ग्लास पाणी प्या.
* चहा, कॉफी, कोल्ड्रिंक सेवन करण्याचे प्रमाण कमी करा.
* पाण्याचे प्रमाण अधिक असलेली फळे खा.
* तीव्र ऊन असल्याने सध्या दुपारच्या उन्हात घराबाहेर पडणे टाळा.



