चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ; शहादा तालुक्यात अंगणवाडीच्या पोषण आहारात आढळल्या अळ्या; पालक संतापले, प्रशासनाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक आणि अघोरी प्रकार उघडकीस आला आहे. शहादा तालुक्यातील जावदा येथील अंगणवाडीत लहान मुलांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारात चक्क अळ्या आढळल्या. एका महिला पालकासह सरपंचांनीच सतर्कपणे हा प्रकार उघडकीस आणला असून, बालकांच्या जीवाशी खेळणाऱ्या दोषी ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
जावदा येथील अंगणवाडी क्रमांक ३ मध्ये नेहमीप्रमाणे शनिवारी (दि. १८) सकाळी बालकांना मिलेट चॉकलेट नावाच्या पोषण आहाराचे वाटप करण्यात येत होते. यावेळी आपल्या चिमुकल्याला तेथे सोडण्यासाठी आलेल्या एका महिला पालकाने मुलांना देण्यात आलेल्या ‘मिलेट चॉकलेट’ पाकिटाची तपासणी केली. यावेळी पोषण आहाराच्या पाकिटात चक्क अळ्या व किडे असल्याचे दिसून आले. या प्रकाराची माहिती मिळताच जावदाचे सरपंच संजय माळी यांनी ग्रामस्थांसह अंगणवाडीत धाव घेतली. प्रत्यक्ष पाहणीत पोषण आहाराच्या पाकिटांमध्ये अळ्या आढळल्याने पालकांनी संताप व्यक्त केला.
तांत्रिक त्रुटीही आल्या समोर
या घटनेमुळे एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यानंतर आता ठेकेदारावर कारवाईची मागणी होत असली तरी प्रत्यक्षात यामागे काही तांत्रिक अडचणीही असल्याचे समोर आले आहे. अंगणवाड्यांना पोषण आहाराचा पुरवठा केल्यानंतर तो आहार ठेवण्यासाठी सुरक्षित जागा किंवा बंदिस्त कपाटच त्याठिकाणी उपलब्ध नाही. महत्त्वाचे म्हणजे पोषण आहार ठेवण्यासाठी कपाटांची मागणी वारंवार करूनही एकात्मिक बाल विकास प्रकल्प प्रशासनाने त्याकडे लक्ष दिले नसल्याची माहिती समोर आली आहे. आहार किती काळ आणि कशा पद्धतीने साठवून ठेवावा, याबाबत कर्मचाऱ्यांना कोणतेही ठोस मार्गदर्शन दिले गेले नसल्याचे समजते.
विशेष म्हणजे इतका गंभीर प्रकार घडूनही एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाच्या अधिकार्यांनी अद्याप या अंगवाडीला भेट दिली नसल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, या घटनेची माहिती सरपंच संजय माळी यांनी तत्काळ महिला बाल विकास अधिकाऱ्यांना दिली असून, या गंभीर प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे. तर अंगणवाडीत येणाऱ्या लहान मुलांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या संबंधित ठेकेदाराचा परवाना रद्द करावा आणि अंगणवाड्यांना मूलभूत सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली आहे.
अंगणवाडीत वाटला जाणारा पोषण आहार मुलांना सुदृढ करण्यासाठी असतो की त्यांना आजारी पाडण्यासाठी, असा प्रश्न या घटनेच्या माध्यमातून उभा राहिला आहे. अशा निकृष्ट दर्जाचा आहार पुरवणाऱ्या ठेकादारावर तत्काळ फौजदारी कारवाई व्हायला हवी. त्यांच्याकडे दूर्लक्ष करणार्या अधिकारी-कर्मचार्यांवर देखील कारवाई होणे आवश्यक आहे.
– संजय साळी, सरपंच, जावदा.



