‘काकेश्वर’ शिक्षणसंस्था चालकावर खुनी हल्ला; गाडी फोडून जीवे मारण्याचा प्रयत्न, थोडक्यात बचावले; नंदुरबारच्या भालेरमधील थरार, सहा जणांना बेड्या, एक फरार!

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शिक्षण संस्थेच्या वादातून भालेर (ता. नंदुरबार) येथील काकेश्वर विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष भास्कर हिरामण पाटील (७८) यांच्यावर गावातीलच सात जणांनी खुनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. १८) दुपारी ११:३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेस भास्कर पाटील जबर जखमी झाले असून, आरोपींनी त्यांची गाडीही फोडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या भालेर येथे काकेश्वर विद्या प्रसारक संस्थेची मोठी जमीन असून, या संस्थेवर संस्थेच्या शाळांची इमारत उभारण्यात आली आहे. मात्र, गावातील काही मंडळींचा पाटील यांनी या जमिनीवर अवैधरित्या कब्जा केल्याचा आरोप आहे. यातून भास्कर पाटील व गावातील काही मंडळी यांच्यात गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहे.
त्यातच काही दिवसांपूर्वी या संस्थेच्या क्रीडांगण आणि व्यायाम शाळा यांच्यासाठी संरक्षक भिंत बांधण्यात आली होती. त्यामुळे गावातील त्यांना विरोध असणारी मंडळी अधिकच संतापली होती. शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास भास्कर पाटील हे भालेरहून नंदुरबारकडे त्यांची स्कॉर्पिओ (क्र. एमएच ३९ एक्यू २४०३) घेऊन नंदुरबारकडे निघाले होते. मात्र, गावापासून काही अंतरावर असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ घडली सहा जणांनी त्यांची गाडी अडवली. यावेळी या टोळीने पाटील यांना चोहोबाजूनी घेऊन ‘तू बाहेर निघ. तुला आज जिवंत सोडत नाही. ही गावाची जागा आहे. तुझ्या बापाची नाही’, असे म्हणत बाहेर येण्यासाठी धमकवले.
याचवेळी आरोपींपैकी मेहुल सुधाकर पाटील याने गाडीचा चालकाच्या बाजूचा दरवाजा उघडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. यानंतर मोठा दगड गाडीच्या मागील बाजूच्या काचेवर दोन वेळा फेकून काच फोडली. पुढे आणखी एक दगड फिर्यादी भास्कर पाटील यांना मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या दिशेने फेकला. बचावाच्या प्रयत्नात भास्कर पाटील यांना डाव्या हाताला खरचटले. हल्लेखोरांनी एवढ्यावरच न थांबता जवळच असलेल्या काकेश्वर विद्या प्रसारक संस्थेच्या संरक्षक भिंतीचे लोखंडी खांब वाकून उखडून टाकले. तेथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचेही नुकसान करीत त्याचे वायर्स तोडले.
दरम्यान, याप्रकरणी संध्याकाळी उशिरा भास्कर पाटील यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. त्यावरून मेहुल सुधाकर पाटील (१९), पवन भिकन पाटील (३२), राहुल प्रल्हाद पाटील (३०), भगवान प्रकाश पाटील (३०), रवींद्र प्रकाश पाटील (३५), महेंद्र प्रकाश पाटील (३४) आणि गजानन भिका पाटील (सर्व रा. भालेर, ता. व जि. नंदुरबार) या सर्वांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी सहा जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, या हल्ल्याचा सूत्रधार गजानन भिका पाटील फरार झाला असून, त्याचा शोध घेतला जात आहे.



