‘देव’च चोरट्यांचे टार्गेट : शहादापाठोपाठ आता अक्कलकुव्यात जैन मंदिरात चोरी; दीड लाखांच्या ऐवजावर डल्ला!; पोलिसांपुढे आव्हान

अक्कलकुवा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागताच चोरट्यांच्या टोळ्या सक्रिय झाल्या असून, परिणामी जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेषता चोरट्यांनी यावेळी विविध समाजांची देवालये टार्गेट केली असून, गेल्या चारच दिवसात जिल्ह्यात दुसऱ्यांदा मंदिरातील ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. यावेळी चोरट्यांनी अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथील जैन मंदिर टार्गेट करीत तेथील दागिन्यांसह सुमारे दीड लाखांचा ऐवज लंपास केला आहे.
१४ एप्रिलच्या रात्री शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील अन्नपूर्णा मातेच्या मंदिरात चोरट्यांनी प्रवेश करून रोख रक्कम आणि सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरून नेला होता. या घटनेचा उलगडा अद्याप बाकी असतानाच आता अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथील श्री जीन कुशलसुरी दादावाडी चॅरिटेबल ट्रस्टच्या जैन मंदिरात प्रवेश करून चोरट्यांनी मोठा हात मारला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १७ एप्रिलला रात्री ८.३० ते १८ एप्रिलच्या सकाळी सहा वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी या मंदिराच्या पाठीमागील खिडकीची मार्बलची जाळी तोडून मंदिरात प्रवेश केला.
यानंतर चोरट्यांनी मंदिरात ठेवलेल्या पाच दानपेट्यांची कुलपे तोडून त्यातील तब्बल ९५ हजारांची रक्कम लंपास केली. याशिवाय चोरट्यांनी मंदिरातील ५२ हजार रुपये किमतीचे लहान मोठ्या आकाराचे सात चांदीचे नारळही (प्रत्येकी १०० ते १५० ग्रॅम वजन) चोरून नेले.
याप्रकरणी मांगीलाल भवरलाल जैन (६२, रा. अक्कलकुवा) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेची दखल अक्कलकुवा पोलिसांनी घेतली असून, पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सारंग नवलकर यांनी पथकासह चोरी झालेल्या मंदिराची पाहणी केली. फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळावरील ठसे गोळा केले असून, श्वान पथकानेही घटनास्थळी जाऊन चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. आता पोलिसांनी चोरट्यांच्या शोधार्थ पथक रवाना केले आहे.



