मुख्य बातम्या

जूनमध्ये भरपूर पाऊस; महापूर, पिकांवरील रोगराई शेतकर्‍यांना रडवणार; राजा कायम, पण आर्थिक, संरक्षण पातळीवर देश अडचणीत, भेंडवळच्या घटमांडणीचे निष्‍कर्ष

बुलडाणा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : सुमारे ३७० वर्षांपासूनची परंपरा असलेल्‍या बुलडाणा जिल्‍ह्यातील भेंडवळ येथील घटमांडणीचे अंदाज आज, सोमवारी (दि. २०) पहाटे जाहीर करण्‍यात आले. या अंदाजानुसार यंदा जून महिन्यात भरपूर पाऊस राहणार असून जुलैमध्ये सर्वसाधारण ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाचा जोर ओसरणार आहे. महापुरामुळे यंदा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल आणि काही पिके भरपूर तर काही पिके सर्वसाधारण राहतील, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, देशाचा राजा (पंतप्रधान नरेंद्र मोदी) कायम राहणार असला तरी आर्थिक आणि संरक्षण पातळीवर देशाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल असेही या घटमांडणीच्या अंदाजातून बाहेर आले आहे.
रविवारी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सूर्यास्ताच्या वेळी भेंडवळमध्ये घटमांडणी करण्यात आली आणि आज सोमवारी सूर्योदयाच्या वेळी या गट मांडणीचे निरीक्षण केल्यानंतर आगामी वर्षाचे पीक, पाणी, पाऊस, राजकारण आणि देशाच्या संरक्षण स्थितीबद्दलचे अंदाज जाहीर करण्यात आले. हे अंदाज ऐकण्यासाठी खानदेशासह मराठवाडा विदर्भ आणि शेजारच्या मध्य प्रदेश राज्यातील शेतकऱ्यांनी भेंडवळमध्ये मोठी गर्दी केली होती.
हे आहेत यंदाच्या घटमांडणीचे प्रमुख निष्कर्ष
* पिकांवर रोगराईचे प्रमाण जास्त असेल.
* कापूस, तांदूळ, तीळ, बाजरी या पिकांचे उत्पन्न भरपूर.
* ज्वारी, तूर, मुंग, उडीद, मटकी, जवस, वाटाणा ही पिके सर्वसाधारण असतील.
* देशाची संरक्षण स्थिती तणावात असेल. 
* राजा कायम असेल.
* देशाची आर्थिक स्थिती मजबूत राहणार नाही.
* पाऊस जूनमध्ये भरपूर, जुलै सर्वसाधारण, ऑगस्ट, सप्टेंबर कमी असेल.
* अनेक भागात महापुरामुळे नुकसान होणार.

काय आहे भेंडवळ भविष्यवाणी?
गेल्या ३७० वर्षांपासून या घटमांडणीच्या आधारावर पर्जन्यमान, पिकांची स्थिती, शेतीमालाचे दर, देशातील राजकीय आणि आर्थिक स्थितीबाबत भेंडवळमध्ये दरवर्षी भविष्यवाणी करण्याची परंपरा आहे. शेती व पावसाविषयक निसर्गाचा सूक्ष्म अभ्यास गुढीपाडवा ते अक्षय्य तृतीया या काळात करुन वर्षभराची भाकिते या घट मांडणीत करण्यात येते. महान तपस्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी ही घटमांडणी सुरु केली होती. आता त्यांचे वंशज ही परंपरा जपत आहेत. 
कशी केली जाते घटमांडणी?
शेतात मध्यभागी खोल खड्डा करुन त्यात मातीचा घट मांडण्यात येतो. या घटात चार मातीची ढेकळे, त्यावर पाण्याने भरलेली घागर आणि घागरीवर पापड, भजा, वडा, सांडोई, कुरडई ठेऊन घटाच्या बाजूला पान सुपारीसह विविध १८ प्रकारची धान्ये मांडली जातात. घटाच्या वर्तुळाकार अठरा धान्ये गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली, करडी मसूर, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा ही धान्ये मांडली जातात. घटात रात्रभर होणाऱ्या नैसर्गिक बदलाचे पहाटे सूक्ष्म निरीक्षण केले जाते. हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पाऊस, हवामान, पीक, अर्थव्यवस्था तसेच देशाचे राजकीय तथा नैसर्गिक संकटाबाबत चाहूल देणारे भाकीत वर्तवण्यात येते.
(टीप : ‘भेंडवळची घट मांडणी’ ही बुलडाण्यातील भेंडवळ येथील परंपरा आहे. त्यातून ते पावसाचा अंदाज वर्तवतात. ‘नंदुरबार पोस्‍ट’ या परंपरेचे केवळ वृत्तांकन करीत आहे.)

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button