नंदुरबार शहर

पोलिस दलासाठी एकलव्य क्रीडा संकुलाचा नवा अध्याय; पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टचे नामकरण व उद्घाटन

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : राज्‍य शासनाच्या गृह विभागांतर्गत जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ मधून पोलिस मुख्यालय, नंदुरबार येथे उभारलेल्या एकलव्य क्रीडा संकुलाच्या इमारतीचे नामकरण तसेच नव्याने तयार करण्यात आलेल्या बॅडमिंटन कोर्टाचे लोकार्पण आणि उद्घाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडले.
या कार्यक्रमास आमदार सर्वश्री चंद्रकांत रघुवंशी, राजेश पाडवी, शिरीष नाईक, जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, पोलिस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलिस अधीक्षक आनंद कांबळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अंकुश पालवे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना मुश्रीफ म्‍हणाले, पोलिस दलाच्या दैनंदिन कार्यात शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती अत्यंत महत्त्वाची आहे. अशा परिस्थितीत अत्याधुनिक आणि सुसज्ज क्रीडा सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. एकलव्य क्रीडा संकुलाच्या माध्यमातून पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियमित व्यायाम, क्रीडा सराव आणि स्पर्धात्मक वातावरण मिळणार असून त्यातून त्यांच्या कार्यक्षमतेत निश्चितच वाढ होईल.
नवीन बॅडमिंटन कोर्टामुळे क्रीडा संस्कृतीला चालना मिळणार असून पोलिस दलात आरोग्यदायी जीवनशैली रुजविण्यास मोठी मदत होईल. क्रीडा हा केवळ मनोरंजनाचा भाग नसून तो शिस्त, संघभावना आणि आत्मविश्वास वाढविणारा महत्त्वाचा घटक आहे, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी एकलव्य क्रीडा संकुलातील विविध सुविधांची पाहणी केली. या संकुलामुळे पोलिस मुख्यालय परिसरात आधुनिक क्रीडा पायाभूत सुविधा निर्माण झाल्या असून, त्याचा लाभ केवळ पोलिस दलालाच नव्हे तर भविष्यातील क्रीडा स्पर्धा आणि प्रशिक्षण उपक्रमांनाही होणार आहे.
जिल्हा वार्षिक योजनेतून साकारलेल्या या प्रकल्पामुळे नंदुरबार जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला नवी दिशा मिळणार असून, शासकीय स्तरावर क्रीडा विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचे हे एक उत्तम उदाहरण ठरणार असल्‍याचा विश्‍वास यावेळी व्‍यक्‍त करण्‍यात आला.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button