नंदुरबार जिल्हा

कलिंगड वाहतूक करणारी पिकअप व्‍हॅन उलटली; शहादा-शिरपूर रस्त्यावर भीषण अपघात, १८ मजूर जखमी, सुदैवाने जीवितहानी टळली

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : शहादा-शिरपूर मार्गावर शनिवारी (दि. २५) संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास कलिंगड भरून शहाद्याकडे येणाऱ्या चारचाकी पिकअप वाहनाचा मागील टायर फुटल्याने भीषण अपघात झाला. टायर फुटल्याने वाहन अचानक अनियंत्रित होऊन उलटल्याने गोंधळ उडाला. या वाहनात तब्बल १८ मजूर बसलेले होते. मात्र सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही.
अपघातग्रस्त वाहनाचा क्रमांक एमएच ०४ जीआर ३६२८ असा असून, वाहनात बसलेले मजूर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच आ. राजेश पाडवी यांनी तातडीने दखल घेत १०८ रुग्णवाहिकेशी संपर्क साधून सर्व जखमी मजुरांना उपचारासाठी शहादा उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था केली.
दरम्यान, अपघाताच्या ठिकाणी शहादाचे नगरसेवक संतोष वाल्हे व प्रदीप ठाकरे यांनी तत्काळ धाव घेत वाहनाखाली अडकलेल्या मजुरांना बाहेर काढून मदतकार्य केले. स्थानिक नागरिकांनीही बचावकार्यात सहकार्य केले.
या अपघातामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वाहनावर क्षमतेपेक्षा अधिक मजूर बसवण्यात आल्याने सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर अशा वाहतुकीवर नियंत्रण आणण्याची मागणी होत आहे.
हे झाले जखमी
सोनी रोमा पाडवी, शिवा काकडे वसावे, सुका शिवा वसावे, कविता चांगल्या वसावे, रविता सोमल्या वसावे, अनिता काकडे वसावे, वर्षा तडवी, मोहन्या तडवी, रवींद्र तडवी, किर्तन तडवी, आमसी रवींद्र वळवी, हिना पवार, अनिल वळवी, शिवराम काकडे वसावे, सुखा शिवराम वसावे, अंजली विकास पाडवी, रविता वसावे, पवन रावल्या तडवी.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button