उद्यापासून खत विक्री बेमुदत बंद; प्रलंबित मागण्यांसाठी कृषी सेवा केंद्र चालकांचा एल्गार; ऐन हंगामात शेतकर्यांची होणार कोंडी

शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत शहादा तालुक्यातील कृषी सेवा केंद्र चालक २७ एप्रिलपासून बेमुदत बंद पुकारणार आहेत. या निर्णयामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईड्स अँड सीड्स डिलर्स असोसिएशन (माफदा) यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील विक्रेत्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. गेल्या ४ ते ५ वर्षांपासून कृषी मंत्री, प्रधान सचिव, कृषी आयुक्त आणि निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही ठोस निर्णय होत नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
रासायनिक खतांमधील ‘लिंकिंग’ बंद करणे, एचटीबीटी कपाशी बियाण्यांवर बंदी, ‘साथी’ पोर्टलची सक्ती हटविणे, खत पुरवठा एफओआर पद्धतीने करणे, विक्री मार्जिन वाढविणे, मुदतबाह्य किटकनाशके कंपन्यांनी परत घेणे, तपासणी अधिकाऱ्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय रद्द करणे, युरिया-डीएपी वितरण धोरणाचा फेरविचार तसेच नवीन बियाणे व किटकनाशक कायद्यातील जाचक अटी शिथिल करणे आदी या विक्रेत्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. यासोबतच शेजारील राज्यांतून येणाऱ्या अवैध व निकृष्ट दर्जाच्या बियाणे, किटकनाशके व तणनाशकांवर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली आहे. हवामान बदलामुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास किटकनाशक विक्रेत्यांना जबाबदार धरू नये, अशीही भूमिका संघटनेने घेतली आहे.
दरम्यान, शहादा तालुका सिड्स, फर्टिलायझर्स, पेस्टीसाईड्स डिलर्स असोसिएशनने तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देत २७ एप्रिलपासून सर्व कृषी सेवा केंद्रे बेमुदत बंद ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. हा बंद पूर्णपणे शांततेत पाळला जाईल व कायदा-सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही, अशी ग्वाही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
तालुका अध्यक्ष कृष्णराव निंबाळकर, उपाध्यक्ष जगनभाई पटेल व सचिव अशोक पाटील यांनी शासनाने तातडीने दखल घेऊन मागण्यांवर निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना या आंदोलनाचा परिणाम शेतकऱ्यांवर होण्याची शक्यता असल्याने शासन काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



