सकाळी लाईट जाण्याची कटकट संपली : मान्सूनपूर्व देखभाल-दुरुस्तीची कामे आता महावितरण फक्त सकाळच्या सत्रात करणार

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : उन्हाळ्यात विजेच्या वाढत्या मागणीच्या कालावधीत आणि पावसाळी परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून वीज यंत्रणेशी संबंधित विविध देखभाल व दुरुस्तीचे पूर्वनियोजित कामे सध्या वेगाने सुरू आहेत. मात्र, उन्हाचा तडाख्यात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी देखभाल व दुरुस्तीची पूर्वनियोजित कामे संबंधित दिवशी सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान करावेत असे निर्देश मुख्यालयाकडून क्षेत्रीय कार्यालयांना शनिवारी (दि. २५) देण्यात आले.
महावितरणची प्रामुख्याने पावसाळ्यात वीजयंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी तसेच वीजपुरवठा खंडित होणे व वीजसुरक्षेचे धोके टाळण्यासाठी वीज ग्राहकांना पूर्वसूचना देऊन देखभाल व दुरुस्तीची कामे राज्यभरात सध्या सुरू आहेत. साधारणतः मे महिन्याच्या अखेरीस सर्व कामे पूर्णत्वास जातात. मात्र, सद्यस्थितीत सकाळी १० ते दुपारी २ किंवा ४ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद ठेवत देखभाल व दुरुस्तीची कामे सुरू आहेत. नागरिकांसाठी ही गैरसोयीची वेळ टाळण्यासाठी यापुढे संबंधित दिवशी व वीजवाहिनीच्या पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीची कामे यापुढे सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान करण्याचे निर्देश मुख्यालयाकडून देण्यात आले आहेत. महावितरणच्या देखभाल व दुरुस्तीची पूर्वनियोजित कामे करताना सर्वप्रथम प्राधान्याने पर्यायी वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याचे तसेच संबंधित वीजग्राहकांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे तसेच प्रसिद्धी माध्यमांद्वारे कळविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.



