‘स्टॉक’ करून ठेवला का? : नंदुरबार जिल्ह्यात उद्यापासून तीन दिवस ‘ड्राय डे’; मद्यविक्री राहणार बंद!

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यातील ६७ ग्रामपंचायतींतील सरपंच आणि सदस्य पदांच्या रिक्त असलेल्या जागांसाठी मंगळवारी (दि. २८) होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील निवडणूक होत असलेल्या क्षेत्रात उद्या, सोमवार (दि. २७) ते बुधवार (दि.२९) असे तीन मद्यविक्री बंद राहणार आहे.
निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी हा आदेश काढला असून, या काळात जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी ‘ड्राय डे’ पाळला जाईल. या आदेशानुसार, निवडणुकीचा आदला दिवस, निवडणुकीचा दिवस आणि निवडणुकीच्या निकालाचा दिवस असे तीन दिवस तालुका मुख्यालय, नगर परिषद आणि नगर पंचायत क्षेत्रात मद्यविक्री बंद ठेवण्यास सोगण्यात आले आहे.
‘एक्साईज’ वॉच ठेवणार
निवडणुका होत असलेल्या ग्रामपंचायतींच्या हद्दीतील देशी, विदेशी दारू विक्री, ताडी दुकाने व सर्व प्रकारच्या मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद राहतील. या आदेशाचे उल्लंघन करणार्या अनुज्ञाप्तीधारांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ५४ व ५६ अनुसार कारवाई केली जाणार आहे. मतदान प्रक्रिया भयमुक्त, न्याय्य व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकांना अवैध मद्यविक्रीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.



