नंदुरबार जिल्हा

नंदुरबार चौथ्‍या क्रमांकाचे ‘हॉट डेस्‍टिनेशन’!; उन्‍हाचा पारा ४४.७ अंशांवर, जनजीवन विस्‍कळीत, रस्‍ते निर्मनुष्‍य, शाळाही भरताहेत फक्‍त सकाळच्‍या सत्रात

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : दिवसागणिक वाढत चाललेल्‍या उन्‍हाने अवघ्‍या महाराष्‍ट्राला भाजून काढले असून, विदर्भातील तीन जिल्‍ह्यांपाठोपाठ नंदुरबार जिल्‍हा राज्‍यातील चौथ्‍या क्रमांकाचा सर्वांत ‘हॉट’ जिल्‍हा ठरला आहे. नंदुरबारमध्‍ये तापमानाचा पारा तब्‍बल ४४.७ अंश सेल्‍सियसवर पाहोचला आहे.
राज्‍यात एप्रिल महिन्‍यातच तापमानाने विक्रमी पातळी गाठली असून, कडक उष्‍णतेबाबत सध्‍या चर्चेत असलेल्‍या विदर्भातील अकोला व अमरावती या दोन शहरांत शनिवारी ४५.६ अंश सेल्‍सियस तापमानाची नोंद झाली. वर्धा येथे ४५.५ अंश सेल्‍यिस तापमान नोंदले गेले, तर ४४.७ अंश सेल्‍यियससह नंदुरबार जिल्‍हा चौथ्‍या क्रमांकावर राहिला.
जनजीवन विस्‍कळीत, रस्‍त्‍यावर शुकशुकाट
प्रचंड उष्णतेमुळे नंदुरबार जनजीवन विस्कळीत झाले असून, दुपारच्या वेळेत रस्ते अक्षरशः निर्मनुष्य दिसत आहेत. उन्हाच्या तीव्र झळांमुळे लोकांनी अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडणे टाळले आहे. दिवसभर कडक ऊन आणि उष्ण वाऱ्यांमुळे शहरातील बाजारपेठा, चौक आणि सार्वजनिक ठिकाणे ओस पडली आहेत. शाळा-कॉलेजमधील विद्यार्थ्यांनाही या उष्णतेचा मोठा फटका बसत असून शाळाही सकाळच्या सत्रात भरत आहेत. तसेच शेतकरी, बांधकाम मजूर, रिक्षाचालक आणि इतर मैदानी काम करणाऱ्या कामगारांना या उन्हाचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.
शेती कामांवर परिणाम
वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे शेतकऱ्यांचे दैनंदिन जीवन मोठ्या प्रमाणात बदलले आहे. तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने दुपारच्या वेळेत शेतात काम करणे अवघड झाले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आता पहाटे लवकर उठून सकाळच्या थंड वातावरणातच शेतीची कामे पूर्ण करण्यावर भर देत आहेत. पहाटेपासूनच शेतात नांगरणी,  पाणी देणे आणि इतर कामे उरकली जात आहेत. सकाळी १० नंतर उन्हाचा कडाका वाढत असल्याने शेतकरी दुपारच्या वेळेत विश्रांती घेत आहेत. यामुळे आरोग्याच्या समस्या टाळण्यास मदत होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, वाढत्या तापमानाचा पिकांवरही परिणाम होत असून पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे सिंचन व्यवस्थेवर ताण येत आहे. हवामानातील या बदलामुळे शेतीच्या वेळापत्रकातही बदल करावा लागत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसून येत आहे.
आरोग्‍य विभागाचा सल्‍ला
आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना दुपारच्या वेळेत बाहेर न पडण्याचा सल्ला दिला असून पुरेसे पाणी पिणे, हलके व सैल कपडे परिधान करणे आणि डोक्याचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. उष्माघाताचा धोका वाढल्याने लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. दरम्‍यान, पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button