भरदिवसा घरफोडी करून दागिने विकायला गेला अन् एलसीबीच्या जाळ्यात अडकला!; ‘विसरवाडी’ हद्दीतील गुन्ह्याचा २४ तासांत उलगडा!

नवापूर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : तालुक्यातील विसरवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडकी येथे झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या २४ तासात उलगडा करण्यात पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) यश आले आहे. तब्बल ८५ हजारांहून अधिक रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारून हे दागिने विक्रीसाठी गेलेला चोरट्या पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकला. अमित भामट्या गावित (रा. खडकीपाडा, ता. नवापूर) असे या चोरट्याचे नाव असून, एलसीबीने त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विसरवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडकी येथील सरलाबाई शंकर गावित यांच्या घरी २३ एप्रिलला भरदिवसा १२ ते ३.३० वाजेच्या दरम्यान धाडसी चोरी झाली होती. चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात घुसून कानातील सोन्याचे टॉप, अंगठी, पायातील चांदीची साखळी, चांदीची अंगठी असे तब्बल ८५ हजार ७८७ रुपये किमतीच्या दागिन्यांवर डल्ला मारला होता. याप्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात अमित भामट्या गावित या चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास विसरवाडी पोलिसांसह एलसीबीकडून समांतर पद्धतीने सुरू होता.
याचदरम्यान एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना या गुन्ह्यातील चोरटा अमित गावित दागिने विकण्यासाठी विसरवाडी येथील नागपूर- सुरत राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाखाली आला असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. पाटील यांनी तातडीने अमितला ताब्यात घेण्यासाठी पथक रवाना केले. एलसीबीचे पथक तेथे पोहोचताच काही क्षणातच त्यांना अमित गावित (२०) संशयास्पदरित्या उभा असल्याचे दिसला. एलसीबीच्या पथकाने झडप घालून त्याला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली देत पंचांसमक्ष ५३ हजार ५०० रुपयांचे दागिने आणि ८ हजार ५०० रुपये रोख असा मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधीन केला. अशा पद्धतीने एलसीबीच्या पथकाने चोरी गेलेल्यापैकी ७० टक्क्यांहून अधिक मुद्देमाल अवघ्या २४ तासात जप्त करण्यात यश मिळवले.
पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस., अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक निरीक्षक राकेश वसावे, हेडकॉन्स्टेबल दिनेश चित्ते, दीपक वारुळे, पोलीस शिपाई अभय राजपूत, रामेश्वर चव्हाण यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली.



