शहाद्याच्या ‘पूज्य साने गुरुजी’ची पोरं हुश्शार, झटक्यात केली ‘जेईई मेन’ पार! निरव, मितेशचे घवघवीत यश

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नुकत्याच जाहीर झालेल्या जेईई (जेईई मेन २०२६) परीक्षेच्या निकालात शहद्यातील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बुद्धिमत्तेची चुणूक दाखवत घवघवीत यश संपादित केले आहे. निरव चौधरी आणि मितेश पाटील या दोन विद्यार्थ्यांनी उच्चांकी गुण मिळवून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
देशभरातील प्रतिष्ठेच्या आयआयटी (आयआयटी) आणि एनआयटी (एनआयटी) सारख्या अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत घेण्यात आलेल्या या परीक्षेत निरव किरण चौधरी याने ९९.१५९ पर्सेंटाइल गुण प्राप्त केले. त्याने इतर मागास प्रवर्गातून अखिल भारतीय पातळीवर ३३५० वा क्रमांक पटकावला आहे. तसेच मितेश ज्ञानेश्वर पाटील याने ९८.५३४ पर्सेंटाइल गुण मिळवत याच प्रवर्गातून ६३२९ वा क्रमांक मिळवला आहे.
या दोन्ही विद्यार्थ्यांनी ‘जेईई ॲडव्हान्स’ परीक्षेसाठी पात्र ठरून मोठी कामगिरी केली आहे. भारतातील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील शिक्षणासाठी जेईई मुख्य परीक्षा ही सर्वोच्च मानली जाते. दरवर्षी दोन सत्रांमध्ये (जानेवारी व एप्रिल) ही परीक्षा घेतली जाते. या वर्षी देशभरातून लाखो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. अशा अत्यंत चुरशीच्या परीक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश वाखाणण्याजोगे आहे.
या यशाबद्दल यशवंत विद्यार्थ्यांचे पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीशभाई पाटील, संस्थेचे समन्वयक प्रा. मकरंद पाटील, संचालक मयूर दीपक पाटील यांनी कौतुक केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.के. पटेल, उपप्राचार्या प्रा. कल्पना पटेल, पर्यवेक्षक प्रा. के.एच. नागेश आणि प्रा. व्ही.सी. डोळे यांनी विद्यार्थ्यांच्या परिश्रमाचे आणि मार्गदर्शकांचे कौतुक करीत त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



