मॉर्निंगची ‘गुड न्यूज’ : पुढील चार दिवस दिलाशाचे; सूर्याचा प्रकोप कमी होणार!, उष्णतेपासून काही अंशी सुटका मिळणार

मुंबई (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : राज्यात उष्णतेच्या लाटेत तापमानाचा पारा दिगसागणिक नवनवे उच्चांक गाठत असतानाच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता पुढील चार दिवस या उष्णतेपासून काही अंशी दिलासा मिळणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
राज्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विशेषत: विदर्भात उष्णतेची लाट आली असून, वाढत्या तापमानाचा या भागातील लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अकोल्यात रविवारी विक्रमी म्हणजे ४६.९ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. विदर्भातील इतर दहा जिल्ह्यांतही ४३.५ ते ४६.८ दरम्यान तापमान राहिले. खानदेशातही वाढत्या उष्णतेने स्थानिकांची होरपळ होत असून, भुसावळमध्ये ४६.५ इतक्या विक्रमी तापमानाची नोंद झाली. सध्या खानदेशात तिन्ही जिल्ह्यांत किमान तापमान २५ अंशांच्या वर राहत आहे.
एकीकडे उन्हाचा कहर वाढत असतानाच उष्णतेला वैतागलेल्या सार्यांसाठी हवामान विभागाने दिलासा देणारी माहिती दिली आहे. महाराष्ट्राला उष्णतेपासून पुढील काही दिवस दिलासा मिळणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. आज, २७ एप्रिलपासून राज्यात तापमानात हळूहळू दोन ते तीन अंश तापमानाची घट होण्याची शक्यता आहे. येत्या १ मेपर्यंत तापमानातील हा उतार कायम राहील, असे हवामान विभागाने म्हटले आहे. किनारपट्टीच्या भागात मात्र उष्ण व दमट हवामान कायम राहील, असा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.
उष्माघाताने दोन बळी
दरम्यान, रविवारी (दि. २६) मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेने दोन बळी घेतले. परभणीत ३७ वर्षीय शिवाजी बबन कांबळे (मुण रा. नाशिक) दिवसभर उन्हात फिरल्यानंतर त्यांना चक्कर आली आणि त्यांचा मृत्यू झाला. तर लातुरमध्येही उष्माघाताने २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. महेश लिंबाजी इंगोले असे या तरुणाचे नाव असून, औसा तालुक्यातील एरंडे गावात ही दुर्दैवी घटना घडली. तो शेतातील काम आटोपून घरी परतल्यानंतर अचानक त्याला चक्कर आली आणि तो खाली कोसळला. कुटुंबीयांनी तातडीने त्याला सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र उष्माघातामुळे त्याचा जागीच मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यातील हा उष्माघाताचा तिसरा बळी ठरला. यापूर्वीही जिल्ह्यात उष्माघाताने औसा तालुक्यातील गोंद्री गावात नऊ महिन्यांच्या बाळाचा तर औराद शहाजनी येथे ६० वर्षीय शेतकऱ्याचाही प्रखर उन्हामुळे मृत्यू झाला होता.



