विधान परिषद निवडणूक : राष्ट्रवादीच्या इच्छुकांच्या यादीत नंदुरबारचे डॉ. अभिजित मोरेंची भर!; सहकार्यांनी निवेदन देऊन मागणी केली खरी, पण…

शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) इच्छुकांच्या यादीत आता नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांचीही भर पडली आहे. शनिवारी (दि. २६) त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्तम महाराष्ट्र प्रभारी आ. अनिल पाटील यांना निवेदन देऊन डॉ. मोरे यांना विधान परिषदेवर संधी देण्याची मागणी केली.
विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या दहा जागांसाठी येत्या १२ मे रोजी मतदान होणार आहे. निवडणूक झाल्यानंतर याच दिवशी निकाल जाहीर होईल. आता सर्वच राजकीय पक्षांमधील नेत्यांची विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या वाट्याला त्यांच्याकडील आमदारांच्या संख्याबळानुसार एक आमदार येणार आहे. विधान परिषदेत निवडून येण्यासाठी एका उमेदवाराला २८ मतांचा कोटा आवश्यक असतो. राष्ट्रवादीचे विधानसभेत ४० आमदार असून, विधान परिषदेत त्यांची दुसरी जागा निवडून येणे अवघड आहे. असे असले तरी सध्या पक्षाच्या वाट्याला आलेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी देव पाण्यात घालून ठेवले आहेत.
जागा एक अन् इच्छुक भरपूर
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीकडून विधान परिषदेवर जाण्यासाठी इच्छुक असलेल्यांमध्ये राजेंद्र जैन, अनिकेत तटकरे, सुनील टिंगरे, उमेश पाटील, आनंद परांजपे, विक्रम संजय काकडे, रूपाली ठोंबरे असे अनेक जण इच्छुक आहेत. ही यादी हनुमानाच्या शेपटीप्रमाणे वाढतच चालली असून, नंदुरबारमधील पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांचाही या यादीत समावेश झाला आहे.
डॉ. मोरे यांच्या समर्थकांना त्यांना विधान परिषदेची संधी मिळावी असे वाटत आहे. याच अनुषंगाने शनिवारी डॉ. मोरे यांचे समर्थक असलेले शहादा शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर, तालुकाध्यक्ष संतोष पराडके, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मोहन शेवाळे, डॉ. जितेंद्र भंडारी, डॉ. चिंतामण पाटील, छोटू कुवर, संजय खंदारे, रवींद्र जावरे आदींनी माजी मंत्री तथा पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी अनिल पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. अत्यंत कठीण परिस्थितीत डॉ. मोरे यांनी जिल्ह्यात पक्षाची ताकद कायम ठेवताना ती वाढवण्याचा प्रयत्न केल्याने त्यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
मागणी झाली, पण…
नंदुरबार जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची फारशी ताकद नाही. जिल्ह्यात पक्षाचा एकही आमदार किंवा खासदार देखील नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांचा विचार केला असता नवापूर व तळोदा नगर परिषदेत पक्षाला मोठे यश मिळाले हेच सध्यातरी पक्षाचे जिल्ह्यातील अस्तित्व मानावे लागेल. शिवाय जिल्ह्यात भाजप आणि त्या खालोखाल शिवसेनेचा वरचष्मा आहे. शिवसेनेने (एकनाथ शिंदे गट) जिल्ह्यातून चंद्रकांत रघुवंशी यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे. अशावेळी आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार नंदुरबार जिल्ह्यातून डॉ. अभिजीत मोरे यांना संधी देतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.



