शहाद्यात गौ सन्मान अभियान रॅलीला उत्स्फुर्त प्रतिसाद; ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी दुमदुमले शहर, समजून घेतले गोमातेचे महत्त्व

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : गौमातेला राष्ट्रमातेच्या दर्जा देण्यात यावा यासाठी देशभर गौ सन्मान अभियान रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहादा येथे हिंदू समाज बांधवांच्या वतीने गौ सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भारतीय जनता पक्षासह विविध पक्षाचे कार्यकर्ते गौ सन्मानासाठी सहभागी झाले होते.
शहीद लालदास चावडी चौक शहादा येथील श्रीराम मंदिरापासून सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास रॅलीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी शहादाच्या उपनगराध्यक्ष माधवी पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील, विश्व हिंदू परिषदेचे जेष्ठ पदाधिकारी अजय शर्मा, हभप खगेंद्र महाराज, हभप हर्षल महाराज यांच्यासह साधुसंतांची उपस्थिती होती.
रॅली मुख्य रस्त्याने प्रांताधिकारी कार्यालयावर पोहोचली. या ठिकाणी मान्यवरांनी जनसमुदायाला संबोधित केले. गौमातेचे महत्व यावेळी समजून सांगण्यात आले. रॅलीत महिलांची संख्या लक्षणीय होती. जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. प्रांताधिकारी कार्यालयात शिष्टमंडळाने निवेदन दिले.
या रॅलीत भाजपचे शहराध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी, विनोद जैन, विश्व हिंदू परिषदेचे राजा साळी, चंद्रकांत पवार, बजरंग दलाचे प्रशांत पाटील, भरत पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ. हेमंत सोनी यांच्यासह मोठ्या संख्येने आजी-माजी नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महिलांची संख्या लक्षणीय होती. दरम्यान, शहादा नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य व स्वच्छता विभागाच्या वतीने शहरातील मेन रोडवरील गटार साफ करून घाण बाहेर टाकल्याने रॅलीच्या रस्त्यावर दुर्गंधी पसरली होती. यामुळे अनेकांनी पालिकेच्या दिरंगाईच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली व निषेधही केला. शहादा पोलिसांनी हेमंत कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता.



