नंदुरबार जिल्हा

नवापूरच्‍या चरणमाळ घाटात भीषण अपघात; ट्रक उलटून चालकाचा मृत्‍यू, वाहनावरील नियंत्रण सुटल्‍याने घडली दुर्घटना; क्‍लिनर किरकोळ जखमी

नवापूर (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : अपघातासाठी ‘डेंजर स्‍पॉट’ अशी ओळख निर्माण झालेल्‍या नवापूरच्‍या चरणमाळ घाटाने आणखी एका वाहनचालकाचा बळी घेतला आहे. या घाटात वाहनावरील नियंत्रण सुटल्‍यानंतर ट्रक उलटल्‍यानंतर त्‍याच ट्रकच्‍या खाली दबून चालकाचा मृत्‍यू झाल्‍याची भीषण दुर्घटना रविवारी (दि. २६) दुपारी २ वाजेच्‍या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, एक सहाचाकी मालट्रक (क्र. जीजे ०३ एएक्‍स ७७६९ हा भरधाव वेगात गुजरातेतून नंदुरबारकडे येत होता. चरणमाळ घाटात पोहोचल्‍यानंतर रस्‍त्‍यावर अचानक वाहनचालक अबुबखर ईस्‍माईल सामा (५२, रा. जलाराम कॉलनी मागे, आनंदनगर, पोरबंदर) याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे काही कळण्‍याच्‍या आतच सदरील ट्रक रस्‍त्‍याच्‍या कडेला असलेल्‍या कठड्यावर जावून आदळत उलटला. यामुळे अबुबखर समोरच्‍या काचेतून बाहेर फेकला जावून खाली पडला. तेवढ्यात ट्रक त्‍याच्‍या अंगावर पडून त्‍याचा जागीच मृत्‍यू झाला. तर त्‍याचा सहकारी क्‍लिनर इलियास अल्‍लारखा निगामना (३९, रा. शेरी नं. ३२, इमाम खान नगर मागे, नवा कुंभारवाडा, पोरंबदर) हा जखमी झाला.
या अपघातामुळे काही काळ या घाटातील वाहतूक विस्‍कळीत झाली होती. मात्र, नवापूर पोलिसांनी तातडीन घटनास्‍थळी पोहोचून वाहतूक सुरळित केली. या प्रकरणी नवापूर पोलीस ठाण्‍यात या मयत ट्रकचालक अबुबखर ईस्‍माईल सामा याच्‍याविरोधात स्‍वत:च्‍या मृत्‍यूस कारणीभूत ठरल्‍याप्रकरणी गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे. पोहेकॉ मोहन शिरसाठ या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button