महाराष्ट्र

नंदुरबार जिल्‍ह्यात होणार लॉजिस्टिक पार्क; तत्काळ प्रस्ताव पाठवण्याचे गडकरींचे निर्देश; रिंग रोडच्‍या डीपीआरसाठीही हिरवाकंदिल; आ. रघुवंशींची भेट ठरली फलदायी

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी लॉजिस्टिक पार्कसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. सोबतच त्‍यांनी शहरातील हाफ रिंग रोडच्या डीपीआर बनवण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे.
शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी सोमवारी (दि. २७) दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन नंदुरबार जिल्ह्यातील विविध प्रकल्पांबाबत चर्चा करून निवेदन सादर केले. या निवेदनाची दखल घेण्यात आली आहे. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी उपस्थित होते.
नंदुरबबार जिल्हा अत्यंत दुर्गम असून, मध्य प्रदेश व गुजरात या राज्यांना सीमा जोडलेल्‍या या जिल्‍ह्याला केंद्राने ‘आकांक्षित जिल्हा’ म्हणून घोषित केले आहे. रोजगाराच्या संधींच्या अभावामुळे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नंदुरबार जीडीपीमध्ये मागे राहिला आहे. रोजगार नसल्याने या जिल्ह्यातील आदिवासी लोक कामाच्या शोधात गुजरात, मध्य प्रदेशसह इतर राज्यांत स्थलांतर करतात. या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी केंद्र सरकारच्या एखाद्या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत किंवा इतर कोणत्याही महत्त्वाच्या योजनेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात एक ‘लॉजिस्टिक पार्क’ स्थापन करण्यात यावे. यामुळे जिल्ह्यातील आदिवासींचा आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकास होऊ शकेल. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील रस्ते कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि मालाची वाहतूक सुलभ होईल. यामुळे जिल्ह्यात कायमस्वरूपी रोजगार निर्माण होऊन स्थलांतर थांबेल, असे आ. रघुवंशी यांनी निवेदनात म्‍हटले आहे.
तळोदा- धडगाव रस्त्याचे रुंदीकरण व्हावे
चांदसैलीमार्गे तळोदा ते धडगाव या रस्ता सुधारण्याच्या बाबतीत आ. रघुवंशी यांनी लक्ष वेधले. तळोदा-चांदसैली-धडगाव रस्त्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे सिमेंट काँक्रीटच्या ४-लेन दुभाजक रस्त्यात रुंदीकरण करण्याबाबत गांभीर्याने विचार व्हावा, बाजारपेठ, शिक्षण व आरोग्य सुविधांसाठी या रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. मात्र, पावसाळ्यात दरडी कोसळून पाणी साचल्यामुळे हा मार्ग विस्कळीत होतो. परिणामी, वाहतूक कोंडी होऊन जीवनावश्यक सेवा खोळंबतात, असेही निवेदनातून निदर्शनास आणण्‍यात आले.
हाफ रिंग रोडमुळे शहराचा विकास हाईल
आ. रघुवंशी यांनी शहरातील हाफ रिंग रोडचा मुद्दाही निवेदनातून उपस्थित केला. शहरातील मर्यादेबाहेरील वाहतूक वळवण्यासाठी एनएच- ७५२ जी क्रॉसिंग ते एसएच- ६ पर्यंत पुढे तळोदा रोडला जोडणारा ‘हाफ रिंग रोड’ किंवा बायपास विकसित करावा, प्रस्तावित हाफ रिंग रोडमुळे लगतच्या रस्त्यांशी अखंड जोडणी सुनिश्चित होईल, वाहतूक कोंडी कमी होईल, रस्ते सुरक्षा वाढेल आणि माल व प्रवाशांची जलद वाहतूक सुलभ होईल. हा प्रकल्प नियोजित शहरी विकासासाठी देखील योगदान देईल आणि या भागातील एकूण वाहतूक कार्यक्षमता सुधारेल, असेही निवेदनात म्‍हटले आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button