लेवा पाटीदार गुजर समाज संपर्क कार्यालय ठरेल एकजुटीचे प्रतिक, समाजाच्या प्रगतीसाठी ठरेल प्रभावी व्यासपीठ : उद्घाटनप्रसंगी अभिजित पाटील यांना विश्वास

शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : लेवा पाटीदार गुजर समाज संपर्क कार्यालय समाज बांधवांचे शैक्षणिक, सामाजिक, कृषी विषयक तसेच अन्य प्रश्न सोडवणुकीसह समाजाच्या सांस्कृतिक विकासाला चालना, एकजुटीला बळकटी देण्याबरोबरच प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ ठरणार आहे. नव्या पिढीला योग्य दिशा देणे, समाजात एकात्मता वृद्धिंगत करणे आणि सर्व समाज बांधवांना एकत्र आणून प्रगती साधने यासाठीही या कार्यालयाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे. असे प्रतिपादन शहाद्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांनी केले.
गुजर समाज उन्नती मंचाच्या मागणीनुसार व अभिजीत पाटील यांच्या पुढाकाराने शहरातील ३२ गाळा मार्केटमध्ये लेवा पाटीदार गुजर समाजाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन समाज बांधवांच्या उपस्थितीत संपन्न झाले. त्यावेळी नगराध्यक्ष पाटील बोलत होते. लेवा पाटीदार गुजर समाजाच्या उज्वल भविष्यासाठी हे संपर्क कार्यालय सक्षम, सकारात्मक आणि मार्गदर्शक केंद्र म्हणून कार्य करेल, असा विश्वासही यावेळी पाटील यांनी व्यक्त केला.
पहिली मागणी पूर्ण….
समाजातील उन्नती मंडळाच्या तरुणांनी समाजाचे लोकप्रतिनिधी या नात्याने पाटील यांच्याकडे मार्च महिन्यात निवेदन देऊन काही मागण्या मांडल्या होत्या. त्यात प्रामुख्याने समाजाचे संपर्क कार्यालय, सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक, समाजातील देवी-देवतांचे एक प्रशस्त मंदिर, अनाथ आश्रम अशा विविध मागण्या मांडल्या होत्या. त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी नगराध्यक्ष पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानुसार समाजाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करून समाज बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी व मंथनासाठी हक्काची जागा प्राप्त करून दिली.
यावेळी दगडू पाटील, हरिभाई पाटील, मुकेश पाटील, सत्यानंद पाटील, माधव पाटील, विवेक पाटील, भूषण पाटील, मनोज चौधरी, निलेश पाटील, धनंजय पाटील, कन्हैयालाल पाटील, कपिल पाटील, नितीन पाटील, कुणाल पाटील, हर्षल पाटील यांच्यासह गुजर समाज उन्नती मंडळाचे सदस्य व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



