नंदुरबार जिल्हा

गावात केवायसी होईना अन्‌ लाडक्‍या बहिणींना महिन्‍याचे १५०० रुपये मिळेनात!; रोजगाराला गेलेल्या नंदुरबारच्‍या तब्‍बल २०० उसतोड मजूर महिलांचा आधार थांबला!

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : हंगामी रोजगारासाठी जावून परतलेल्‍या तब्‍बल दोनशेहून अधिक लाडक्‍या बहिणींची महिन्‍याकाठी राज्‍य सरकारकडून आधार म्‍हणून दिल्‍या जाणार्‍या १५०० रुपये मिळविण्‍यासाठी वणवण सुरू असल्‍याचे चित्र नंदुरबारच्‍या पूर्व भागात दिसत आहे. गावातील सीएससी सेंटरमध्‍ये केवायसी हाईना, तालुक्‍याला जावून हे काम करून घेणे परवडेना अन्‌ त्‍यातच केवायसी करून घेण्‍याची अंतिम मुदत तीन दिवसांवर येऊन ठेपलेली अशा तिहेरी कोंडीत या महिला अडकल्‍या आहेत.
नंदुरबारच्‍या पूर्व भागातील बलवंड, रजाळेसह आसपासच्‍या पाड्यांवरील अनेक कुटुंब सहा महिन्‍यांपूर्वी हंगामी रोजगार म्‍हणून पश्‍चिम महाराष्‍ट्रातील पुणे, बारामती, सांगली, सातारा, कोल्‍हापूर या साखर पट्ट्यात उसतोड मजूर म्‍हणून कामाला गेले होते. साखर हंगाम संपल्‍यानंतर ही सर्व कुटुंबे मार्चअखेर आपापल्‍या गावी परतले. दरम्‍यानच्‍या काळात जानेवारीपासून थांबलेले लाडकी बहिण योजनेचे पैसे काढण्‍यासाठी या कुटुंबांतील महिलांनी बँकांमध्‍ये धाव घेतली. मात्र, हे हप्‍य्‍चे पैसे केवायसी केली नसल्‍याने आले नसल्‍याची उत्तरे त्‍यांना बँकेतून मिळाली.
लाडकी बहिण योजनेचे पैसे पुढे नियमित मिळण्‍यासाठी राज्‍य सरकारने महिलांना केवायसी करून घेणे बंधनकारक केले आहे. केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घेण्‍यासाठी आता ३० एप्रिलची अंतिम मुदत देण्‍यात आली आहे. या वेळेत ही प्रक्रिया पुर्ण न करणार्‍या महिलांना या योजनेच्‍या लाभापासून कायमचे मुकावे लागण्‍याची शक्‍यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्‍ह्यातील या दोनशेहून अधिक महिलांच्‍या सीएससी सेंटरवर चकरा मारणे सुरू आहे. मात्र, गावातील सीएससी सेंटरवर नेटवर्कअभावी ही प्रक्रिया पुर्ण होत नसल्‍याने या महिलांना तालुक्‍याच्‍या ठिकाणी असलेल्‍या सीएससी सेंटरकडे धाव घ्‍यावी लागत आहे. परंतु, तेथेही गर्दीमुळे या योजनेची वेबसाईट बंद पडत असल्‍याने या महिलांच्‍या पदरी निराशाच पडत आहे. त्‍यातच आता केवायसी प्रक्रिया पुर्ण करण्‍यासाठी अवघे तीन दिवस शिल्‍लक असल्‍याने या महिलांना कायमचे या योजनेच्‍या लाभापासून वंचित राहावे लागण्‍याची भीती सतावत असल्‍याचे चित्र आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button