मुख्य बातम्या

शहाद्याच्‍या एचडीएफसी बँकेचे ठेवीदार धास्‍तावले; ठेवी तपासण्‍यासाठी ग्राहकांची बँकेत धाव, अनेकांना गंडा घातल्‍याची शंका, मॅनेजर पालोदकरसह भालेराव फरारच!; आरोपीही वाढण्‍याची शक्‍यता

शहादा (खास बातमीदार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहाद्यात एचडीएफसी बँकेच्‍या व्‍यवस्‍थापकाने दोन ग्राहकांच्‍या तब्‍बल सुमारे ५० लाख रुपयांच्‍या ठेवींवर डल्‍ला मारल्‍याचे प्रकरण उघडकीस आल्‍यापासून बँकेच्‍या या शाखेत ठेवी असलेल्‍या ग्राहकांची झोप उडाली आहे. आपल्‍या ठेवी सुरक्षित आहेत की नाही, हे तपासण्‍यासाठी ठेवीदारांनी बँकेत चकरा मारायला सुरूवात केली असून, बँक व्‍यवस्‍थापक अमित पालोदकर याने याच पद्धतीने आणखी काही ग्राहकांच्‍या ठेवींवर डल्‍ला मारल्‍याची शंका व्‍यक्‍त होत आहे.
दरम्‍यान, सुमारे ५० लाखांचे प्रकरण उघडकीस आल्‍यापासून फरार झालेला पालोदकर आणि त्‍याच्‍या शालकाचा मित्र आदर्श भालेराव हे दोघे अद्याप पोलिसांच्‍या हाती मात्र लागलेले नाहीत. पालोदकरच्‍या ग्राहकांना गंडा घालण्‍याच्‍या प्रकरणाची व्‍याप्‍ती मोठी असल्‍याची शंका व्‍यक्‍त करीत विशेष सूत्रांनी या प्रकरणात आणखी काही आरोपींचा समावेश असण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त केली आहे. दरम्‍यान, या प्रकरणात एचडीएफसी बँकेकडून अद्याप तरी अधिकृत कोणतीही भमिका स्‍पष्‍ट करण्‍यात आलेली नाही.
एचडीएफसी बँकेच्या शहादा शाखेचा लालची व्‍यवस्‍थापक (कस्टमर रिलेशन मॅनेजर) अमित अनिल पालोदकर (रा. पालोद, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) याने सेवानिवृत्त प्राचार्यांसह दोघांच्‍या ४९ लाख ५० हजार रुपयांच्‍या ठेवीची रक्‍कम परस्पर शालकासह त्याच्या मित्राच्या खात्यात वळवल्‍याचे प्रकरण २३ एप्रिलला उघडकीस आले होते. यात पालोदकर याने सेवानिवृत्त प्राचार्य प्रल्हाद पाटील (७७, रा. मोहिदे त. ह. ता. शहादा) यांच्‍या खात्‍यातून ३८ लाख २० हजार २४८ रुपयांची तर सखाराम पाटील (रा. जुने मोहिदा रो, हादा) यांच्‍या खात्‍यातून ११ लाख ३० हजार रुपयांची ठेव रक्कम आपल्‍या शालकासह त्‍याच्‍या मित्राच्‍या खात्‍यावर परस्‍पर वळवली होती. या प्रकरणी तक्रार दाखल होताच शहादा पोलिसांनी पालोदकर याच्‍यासह त्‍याचा शालक अनिकेत सुनील महाजन (जळगाव) व अनिकेतचा मित्र आदर्श विलास भालेराव (जळगाव) अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तत्परतेने अनिकेत महाजन याला अटक केली असली तरी पालोदकर व भालेराव हे दोघे मात्र फरार झाले होते. आज पाचव्या दिवशीपर्यंत तरी हे दोघे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.
आरोपी वाढण्‍याची शक्‍यता
याच दरम्यान एचडीएफसी बँकेच्या शहादा शाखेत अनेक ग्राहकांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी असून, या ग्राहकांनी आपल्या ठेवी सुरक्षित आहेत की नाही हे तपासण्यासाठी बँकेची संपर्क सुरू केला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. दुसरीकडे, अशा स्वरूपाची काही प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत असून, एचडीएफसी बँकेनेही पालोदकर याची अंतर्गत चौकशी सुरू केली आहे. तर पालोदकर एकटा एवढी मोठी हिम्मत करण्याची शक्यता कमी असून, त्यामुळे हे प्रकरण फार मोठे असण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली. पालोदकर याने इतर काही जणांची मदत घेऊन वेगवेगळ्या क्‍लृप्‍त्‍या लढवून बँकेतील अनेकांच्या ठेवींवर डल्ला मारल्याची शंका आहे. यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणि आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यताही या सूत्रांनी व्यक्त केली.
दरम्यान, बँकेच्या आपल्याच शाखेतील अनेक ग्राहकांच्या मुदत ठेवींवर डल्ला मारणारा अमित पालोदकर व त्याचा सहकारी आदर्श भालेराव सध्या अटकपूर्व जामीनासाठी ही प्रयत्न करीत असल्याचीही माहिती समोर आली आहे. सध्या हे दोघे फरार असून, पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. मात्र, तूर्त तरी हे दोघे पोलिसांच्‍या हाती लागलेले नाहीत.

अमित पालोदकर व त्याच्या सहकार्‍याचा शोध सुरू आहे. एचडीएफसी बँकेच्या शहादा शाखेत पैशांची गुंतवणूक केलेल्‍यांसह ठेवी असलेल्या ग्राहकांनी तातडीने बँकेशी संपर्क साधून आपले पैसे सुरक्षित असल्‍याची खात्री करून घ्‍यावी. तसेच काही गडबड झाल्याची शंका असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा.
– हेमंतकुमार पाटील (पोलीस निरीक्षक, शहादा)
– प्रवीण सोनवणे (सहायक पोलीस निरीक्षक, शहादा)

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button