साखर कारखान्यातून दूषित मळी वाहणारी पाटचारी कंत्राटदाराने बुजवली; गंभीर आरोप करीत शिवसेनेची शहादा प्रांत कार्यालयावर धडक, आंदोलनाचा इशारा

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : पुरुषोत्तमनगर (शहादा) येथील साखर कारखान्यातून दूषित मळी वाहून नेण्यासाठी तयार करण्यात आलेली पाटचारी बेकायदेशीरपणे बुजवून पर्यावरण व नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केल्याचा गंभीर आरोप शहादा तालुका शिवसेनेने केला आहे. या प्रकरणी संघटनेने उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) शहादा यांना निवेदन देत कठोर कारवाईची मागणी केली असून, संबंधित विकासकाने टाकलेला भराव तत्काळ हटवून मळीचा प्रवाह पूर्ववत न केल्यास तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशाराही शिवसेनेने दिला आहे.
पुरुषोत्तमनगर साखर कारखान्यातील दूषित मळीची सुरक्षित विल्हेवाट लावण्यासाठी कारखाना प्रशासनाने कारखाना परिसरापासून शहादा शहरालगतच्या मोहिदा शिवारापर्यंत विशिष्ट पाटचारीची निर्मिती केली होती. गेल्या अनेक वर्षांपासून याच मार्गाने दूषित मळीची विल्हेवाट लावली जात आहे. मात्र, गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वी मोहिदा शिवारातील सर्वे क्रमांक ५९२ जवळील एका विकासकाने पूर्वपरवानगी न घेता केवळ स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या या पाटचारीवर जेसीबीच्या साहाय्याने सुमारे १५० ते २०० मीटर लांबीचा मातीचा भराव टाकून ती बेकायदेशीरपणे बुजवून टाकली आहे, असे शिवसेना शहादा तालुका प्रमुख मनलेश जायसवाल यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे.
या प्रकारामुळे दूषित मळीचा नैसर्गिक प्रवाह ठप्प होऊन पुरुषोत्तमनगर, डोंगरगाव, आदिनाथनगर, महावीर नगर, पार्श्वनाथ नगर, मानस विहार नगर, छोरीया टाऊन तसेच शिक्षक कॉलनी परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दूषित मळी साचून राहिल्याने भूगर्भातील पाणी प्रदूषित होण्याचा धोका असून, परिसरातील शेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. हा प्रकार पर्यावरणीय गुन्ह्याच्या स्वरूपाचा आहे. त्यामुळे संबंधितांवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करून पाटचारीवरील भराव हटवावा व मळीचा प्रवाह पूर्ववत सुरू करावा, अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
याबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास शहादा तालुका शिवसेनेतर्फे कायदेशीर मार्गाने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
या तक्रार अर्जावर तालुका प्रमुख मनलेश जायसवाल यांच्यासह शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र पेंढारकर, महेश पाटील, हितेंद्र वर्मा, रमण नवले, बाबुराव चोंगडे, रेहम ठाकरे आणि जगदीश ठाकरे यांच्या स्वाक्षर्या आहेत. प्रभारी नायब तहसीलदार जगदीश चखणे यांनी अर्ज स्वीकारून तक्रारीच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाहीचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी नंदुरबार, शहादा पोलीस निरीक्षक, तहसीलदार, शहादा न.प. मुख्याधिकारी तसेच पुरुषोत्तमनगर साखर कारखान्याचे व्यवस्थापक यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.



