गावकारभारी निवडीसाठी चुरस; नंदुरबार जिल्ह्यात ग्रा.पं. पोटनिवडणुकीत ७१.१६ टक्के मतदान; नवापुरात सर्वाधिक, तर तळोद्यात मतदानाचा टक्का सर्वांत कमी, आज निकाल

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यात आज, मंगळवारी (दि. २८) पार पडलेल्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत सरासरी ७१.१६ टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील २२ ग्रामपंचायतींमधील सदस्यांच्या १७ जागा आणि ७ सरपंच पदांसाठी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी दिसून आली होती. या निवडणुकीचा निकाल बुधवारी (दि. २९) जाहीर होणार आहे.
जिल्ह्यात एकूण २३ हजार ५८० मतदार मतदानासाठी पात्र होते. त्यामध्ये ११ हजार ९३६ महिला, ११ हजार ६४४ पुरुष आणि इतर ५ मतदारांचा समावेश होता. दिवसभरात दर दोन तासांनी जाहीर झालेल्या मतदानाच्या आकडेवारीनुसार मतदानाचा टक्का सातत्याने वाढत गेला.
सकाळी ७.३० ते ९.३० या पहिल्या टप्प्यात १६.१८ टक्के मतदान झाले. त्यानंतर ११.३० वाजेपर्यंत ३५.१७ टक्के, दुपारी १.३० पर्यंत ५०.१७ टक्के, तर सायंकाळी ५.३० पर्यंत ६०.५९ टक्के मतदान नोंदवले गेले. अंतिम आकडेवारीनुसार जिल्ह्यात ७१.१६ टक्के मतदान झाले. तालुकानिहाय पाहता नवापूर तालुक्यात सर्वाधिक ७६.०७ टक्के मतदान झाले. येथे ७ ग्रामपंचायतींमध्ये ६ हजार ३९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तळोदा तालुक्यात सर्वांत कमी ५७.१० टक्के, अक्कलकुवा तालुक्यात ७०.६५ टक्के, शहादा तालुक्यात ६९.४३ टक्के, तर अक्राणी तालुक्यात ७३.६५ टक्के मतदान झाले.
मतदान प्रक्रियेदरम्यान महिला मतदारांचा उत्साह विशेष लक्षवेधी ठरला. अनेक ठिकाणी सकाळपासूनच महिलांनी मतदान केंद्रांवर रांगा लावून लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदवला. ग्रामीण भागातही मतदारांनी विकासाच्या मुद्द्यांवर मतदान केल्याची चर्चा होती.
प्रशासनाने मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याने निवडणूक शांततेत पार पडल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, उत्स्फूर्त मतदानामुळे पोटनिवडणुकीच्या निकालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून अनेक ग्रामपंचायतींमध्ये चुरशीच्या लढती झाल्याने निकालात रंगत वाढली आहे.



