नंदुरबार जिल्हा

अफवांचा बाजार सुरूच : ‘मुले पळविणारा’ समजून बेघर व्‍यक्‍तीला तुडवले, पण पोलिसांनी वाचवले; मारहाण करणार्‍या सहा जणांवर गुन्‍हा, समशेरपुरातील धक्‍कादायक घटना!

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : जिल्‍ह्यात मुले पळविणारी टोळी आल्‍याच्‍या गेल्‍या काही दिवसांपासून सुरू असलेल्‍या अफवेची उठलेली धूळ खाली बसायला तयार नसल्‍याचे आणखी एका घटनेवरून स्‍पष्‍ट झाले आहे. नंदुरबार तालुक्‍यातील समशेरपूर येथे मुले पळविणार्‍या टोळीचा सदस्‍य समजून एका बेघर व्‍यक्‍तीलाच काही जणांनी बेदम मारहाण केल्‍याचा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला आहे. केवळ दैव बलवत्तर म्‍हणून वेळीच पोलिसांनी हस्‍तक्षेप केल्‍याने या व्‍यक्‍तीचे प्राण वाचले असून, आता पोलिसांनी त्‍याला मारहाण करणार्‍या ५ ते ६ जणांवर गुन्‍हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, रघुभाई राबविरसिंग पटेल (५५, रा. लालोर, जि. भिंड, मध्‍यप्रदेश) हा व्‍यक्‍ती बेघर असून, फिरत फिरत समशेरपूर (ता. नंदुरबार) येथे आला होता. अनोळखी व्‍यक्‍ती दिसताच काही जणांनी मुले पळविणार्‍या टोळीचा सदस्‍य आपल्‍या गावात आल्‍याची आवई (अफवा) उठवली. थोड्याच वेळात गावकरी रघुभाई असलेल्‍या ठिकाणी पोहोचले. त्‍याला घेरून जाब विचारण्‍यात येऊ लागला. यात तो थोडासा गडबडल्‍याने स्‍थानिकांचा संशय दाट झाला आणि काही कळण्‍याच्‍या आतच काही जणांनी रघुभाईला मारहाण सुरू केली.
पोलिसांनी वाचविला जीव
याच दरम्‍यान काही जणांनी मुले पळविणार्‍या टोळीतील सदस्‍य पकडल्‍याची माहिती नंदुरबार तालुका पोलिसांन कळविली. पोलिसांनी तेथे पोहोचल्‍यावर रघुभाईला जमावाच्‍या तावडीतून सोडवून त्‍याची चौकशी केली. यावेळी त्‍याने आपल्‍याबद्दलची इत्‍यंभूत माहिती दिली. यातून गावकर्‍यांनी केवळ अफवेवर विश्‍वास ठेवून आणि गैरसमजातून रघुभाईला मारहाण केल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. यानंतर पोलिसांनी त्‍याला सुरक्षितपणे वैद्यकीय उपचारासाठी दाखल करून नंतर आधार बेघर निवारागृह, नंदुरबार येथे हलविले.
खबरदार, अफवा पसरवू नका…
दरम्‍यान, रघुभाईला मारहाण केल्‍याप्रकरणी तालुका पोलिसांनी ५ ते ६ जणांवर गुन्‍हा दाखल केला आहे. सोबतच जिल्‍हा पोलीस दलाने अफवांवर विश्‍वास न ठेवण्‍याचे आवाहन करतानाच अफवा पसरविण्‍याचा दंडनीय अपराध करणार्‍यांवर कडक कारवाई करण्‍याचा इशाराही दिला आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button