गुन्हे वार्ता

मंदिरात चोरी @ नं. ४, यावेळी ‘श्रीं’नाही सोडले नाही : नवापुरात मध्‍यवर्ती श्री गणपती मंदिरातून चांदीचे छत्र, मुकुटासह सिंहासनावरील सजावटीचे वाघ लंपास; पोलिसांपुढे आव्‍हान

नवापूर (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : नवापूर शहरात मंदिरांतील चोरीच्‍या घटना थांबायला तयार नसून, यावेळी चोरट्यांनी थेट शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्री गणपती मंदिराला टार्गेट केले आहे. गेल्या दीड महिन्यातील केवळ मंदिरात झालेली चोरीची ही चौथी घटना असून, या माध्‍यमातून अज्ञात चोरट्यांनी थेट पोलिसांनाच खुले आव्हान दिले आहे.
मंगळवारी मध्यरात्री सुमारे १२.३० वाजेच्या सुमारास तीन अज्ञात चोरट्यांनी नगर पालिकेजवळील सरदार चौक परिसरातील सीसीटीव्हींनी सज्ज आणि वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या श्री गणपती मंदिराच्या मागील बाजूने कंपाउंडमधून प्रवेश केला. कटरच्या साह्याने मंदिराच्या दरवाजाचा कडी-कोंडा तोडून त्यांनी आत प्रवेश करत थेट गणपती बाप्पांच्या चांदीच्या आभूषणांवर डल्ला मारला.
चोरट्यांनी अंदाजे ८०० ते ९०० ग्रॅम वजनाचे चांदीचे छत्र, मुकुट आणि सिंहासनावरील सजावटीचे वाघ लंपास केले. मंदिरातील दानपेटी फोडण्याचाही प्रयत्न केला गेला; मात्र तो अयशस्वी ठरल्याने त्यातील रोकड वाचली. चांदीचे पत्रा लावलेले अवजड सिंहासन नेण्याचा चोरट्यांचा प्रयत्‍नही यशस्‍वी ठरला नाही.
बुधवारी सकाळी मंदिराचे पुजारी अजित पाथरकर महाराज पूजा करण्यासाठी आले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. दरवाजाचा तुटलेला कडी-कोंडा पाहून त्यांनी तत्काळ मंदिर ट्रस्टी व नवापूर पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला. मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, संशयितांचा शोध घेण्यासाठी विविध पथके कामाला लागली आहेत.
सलग चौथे मंदिर फोडले
यापूर्वी महामार्गालगतचे रोकडे हनुमान मंदिर, मंगलदास पार्क परिसरातील विघ्नेश्वर महादेव मंदिर आणि गणेश हिल परिसरातील सोमनाथ महादेव मंदिर येथेही अशाच प्रकारच्या चोऱ्या घडल्या होत्या. या सर्व घटनांमध्ये मंदिरातील मौल्यवान वस्तूंवरच डल्ला मारण्यात आल्याने एकाच टोळीचा हात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वी शहराच्या तिन्ही दिशांना असलेली मंदिरे लक्ष्य केल्यानंतर आता चोरट्यांनी शहराच्या मध्यभागी असलेल्या प्रमुख गणपती मंदिरालाच निशाणा बनवल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे पोलिसांच्या गस्त आणि सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button