शहादा पं.स.चा कंत्राटी अभियंता भुपेंद्र राठोड अडकला ‘एसीबी’च्या जाळ्यात; २० हजारांची लाच स्वीकारताना चतुर्भूज; जि.प. ‘समाज कल्याण’च्या दोन अधिकाऱ्यांवरही गुन्हा

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहादा पंचायत समितीच्या ग्रामीण गृहनिर्माण विभागातील कंत्राटी लाचखोर अभियंता भुपेंद्र सरचंदराव राठोड याला अखेर बुधवारी (दि. २९) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ॲन्टी करप्शन ब्युरो - एसीबी) २० हजारांची लाल स्वीकारताना रंगेहाथ पकडले. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटक वस्ती विकास योजनेच्या प्रशासकीय मंजुरीच्या आदेशाची प्रत देण्यासाठी हे पैसे घेताना राठोड ‘एसीबी’च्या जाळ्यात अडकला. या लाचखोरीत त्याला साह्य केल्याप्रकरणी समाज कल्याण विभागातील एका वरिष्ठ सहायकासह सहायक लेखा अधिकाऱ्यावरही लाचेची मागणी व प्रोत्साहन दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुकावल (ता. शहादा) येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तीत पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामासाठी जिल्हा परिषद, नंदुरबार येथे तक्रारदाराने प्रस्ताव सादर केला होता. या कामासाठी ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी २ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. मात्र, या मंजुरीच्या प्रशासकीय आदेशाची प्रत आरोपींपैकी एक असलेल्या रमेश बागुल याने भूपेंद्र राठोडकडे परस्पर देऊन टाकली होती. तक्रारदाराने २७ एप्रिल २०२६ रोजी जिल्हा परिषद कार्यालयात जाऊन बागुलची भेट घेतल्यावर त्याने तक्रारदाराकडे २० हजार रुपयांची मागणी करीत ही रक्कम राठोडकडे देण्यास सांगितले. या मागणीला सहायक लेखा अधिकारी चंद्रेश शहा यांनी प्रोत्साहन दिले.
अन् जाळ्यात अडकला
लाच देण्याची इच्छा नसल्याने नंदुरबार एसीबीकडे धाव घेतली. त्यानुसार आज (दि. २९) शहादा येथे सापळा रचण्यात आला. भूपेंद्र राठोड याने तक्रारदाराकडून लाचेचे २० हजार रुपये स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ ताब्यात घेतले. भूपेंद्र सरचंदराव राठोड (३१, कंत्राटी अभियंता, ग्रामीण गृहनिर्माण विभाग, पं.स. शहादा, रमेश मन्साराम बागुल (५६, वरिष्ठ सहायक, समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद नंदुरबार) आणि चंद्रेश जगजीवनदास शहा (५१, सहायक लेखा अधिकारी, समाज कल्याण विभाग, जि.प., नंदुरबार) अशी या तिन्ही आरोपींची नावे असून, त्यांच्याविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ आणि १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक प्रशांत भरते, पोलीस निरीक्षक विकास लोंढे, विलास पाटील, देवराम गावीत, विजय ठाकरे, हेमंतकुमार महाले, नरेंद्र पाटील, जितेंद्र महाले, संदीप खंडारे आणि सुभाष पावरा यांच्या पथकाने केली.



