मुख्य बातम्या

शहाद्याच्‍या ‘एचडीएफसी’तील पालोदकरच्‍या ‘अमिट’ लीला : गतवर्षीच उडवली होती एकाची ७.८१ लाखांची ‘एफडी’, त्‍यावेळी वाचला अन्‌ हिंमत वाढली, फसवणुकीचा आकडा वाढता वाढता वाढे; बँकच्‍या ‘शांत’ धोरणाने सारेच अचंबित!

शहादा (खास बातमीदार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : ग्राहकांच्‍या मुदत ठेवींच्‍या रकमेवर डल्‍ला मारल्‍याचा आरोप असलेला एचडीएफसी बँकेच्‍या शहादा शाखेतील व्‍यवस्‍थापक अमित अनिल पालोदकर याने केलेल्‍या गुह्यांची यादी वाढतच चालली आहे. पालोदकरने वर्षभरापूर्वीच एक महिलेची मुदत ठेवीची ७ लाख ८१ हजार रुपयांची रक्‍कम परस्‍पर शालकाच्‍या जळगावातील दुसर्‍या नामांकित बँकेच्‍या खात्‍यात वळविली होती. याबाबतचे प्रकरण पोलिसांत गेल्‍यावर पालोदकरच्‍या नातेवाईकांनी ती रक्‍कम संबंधित महिलेला परत केली. त्‍यामुळे त्‍यावेळी पालोदकरवर गुन्‍हा दाखल झाला नव्‍हता, अशी धक्‍कादायक माहिती पुढे आली आहे.
दरम्‍यान, पालोदकरने फसवणूक केलेल्‍या एचडीएफसी बँकेच्‍या ठेवीदारांची यादी मोठी असण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त होत असून, गेल्‍या वर्षीच पालोदकरला अटक झाली असती तर कदाचित इतर ठेवीदार फसवणुकीपासून बचावले असते, अशी चर्चाही सध्‍या सुरू आहे.
एचडीएफसी बँकेच्या शहादा शाखेचा लालची व्‍यवस्‍थापक (कस्टमर रिलेशन मॅनेजर) अमित अनिल पालोदकर (रा. पालोद, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) याने दोघांच्‍या ४९ लाख ५० हजार रुपयांच्‍या ठेवीची रक्‍कम परस्पर शालकासह त्याच्या मित्राच्या खात्यात वळवल्‍याचे प्रकरण २३ एप्रिलला उघडकीस आले होते. यात सेवानिवृत्त प्राचार्य प्रल्हाद पाटील (७७, कमलताई सोसायटी रा. मोहिदे त. ह. ता. शहादा) यांच्‍या खात्‍यातून ३८ लाख २० हजार २४८ रुपये तर सखाराम पाटील (रा. जुने मोहिदा रोड, शहादा) यांच्‍या खात्‍यातून ११ लाख ३० हजार रुपयांची मुदत ठेव रक्कम पालोदकरने आपल्‍या शालकासह त्‍याच्‍या मित्राच्‍या खात्‍यावर परस्‍पर वळवली होती. या प्रकरणी शहादा पोलिसांनी पालोदकर, त्‍याचा शालक अनिकेत सुनील महाजन (जळगाव) व अनिकेतचा मित्र आदर्श विलास भालेराव (जळगाव) या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्‍या अनिकेत महाजन अटकेत असला तरी पालोदकर व भालेराव हे दोघे अद्याप फरार आहेत.
९ महिन्‍यांपूर्वीच घडला होता असाच प्रकार
गेल्‍या वर्षी १७ सप्‍टेंबर २०२५ रोजी शहादा येथीलच ज्‍योती जीवन जगदाळे यांनी शहादा पोलीस ठाण्‍यात अमित पालोदकर याच्‍याविरोधात तक्रार अर्ज दिला होता. पालोदकरने विश्‍वासघात करून आपल्‍या मुदत ठेवींपैकी ७ लाख ८१ हजार ८०० रुपयांची रक्‍कम त्‍याचा शालक अनिकेत सुनील महाजन याच्‍या जळगाव जनता बँकेच्‍या खात्‍यात परस्‍पर वळविल्‍याचे या तक्रार अर्जात जगदाळे यांनी म्‍हटले होते. हा सर्व प्रकार गतवर्षी एप्रिल ते मे या कालावधीत झाल्‍याचे जगदाळे यांना १७ सप्‍टेंबर २०२५ रोजी बँकेत गेल्‍यानंतर त्‍यांच्‍या लक्षात आले होते. यानंतर त्‍यांनी त्‍याच दिवशी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
नातेवाईकांकडून गयावया अन्‌…
पालोदकर विरोधात पोलिसांत तक्रार दाखल होताच ज्‍याच्‍या बँक खात्‍यात ७ लाख ८१ हजारांची रक्‍कम वळती झाली होती तो अनिकेत महाजन आणि अमित पालोदकरच्‍या वडिलांनी तातडीने शहाद्याचे तत्‍कालीन पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्‍याशी संपर्क साधला. ही रक्‍कम आपल्‍या खात्‍यात कशी आली याची माहितीच नसल्‍याचा पवित्रा महाजनने घेतला, तर अमितच्‍या गुह्यांची कल्‍पना नसल्‍याचे त्‍याच्‍या वडिलांनी पोलिसांना सांगितले. तसेच रक्‍कम परत करण्‍याची तयारीही दर्शवत त्‍यासाठी मुदत मागून घेतली. यानंतर ठरलेल्‍या मुदतीत रक्‍कम परतही केली. यामुळे तक्रारदाराने प्रकरण पुढे नेले नाही आणि त्‍यावेळी पालोदकरवर गुन्‍हा दाखल झाला नाही, अशी माहिती पुढे आली आहे. त्‍याचवेळी कदाचित पालोदकरवर गुन्‍हा दाखल होऊन त्‍याच्‍यावर कारवाई झाली असती तर पुढे अन्‍य ग्राहकांची फसवणूक वाचली असती अशी चर्चा शहादा परिसरात आता सुरू आहे.
गोड बोलून गंडा घालण्‍याची ‘मोडस ऑपरेंडी’
सेवानिवृत्त प्राचार्य प्रल्हाद पाटील, सखाराम पाटील आणि ज्‍योती जगदाळे या तिघांच्‍याही फसवणूक प्रकरणात बरेच साम्‍य आहे. या तिघांनाही त्‍याने गोड बोलून फसवल्‍याचे त्‍यांच्‍या तक्रारीवरून स्‍पष्‍ट होत आहे. एचडीएफसी बँकेत आलेल्‍या ग्राहकांशी गोड बोलून जवळीक साधायची. मग त्‍यांच्‍या ‘सधन’तेची माहिती घेऊन बँकेत त्‍यांचे कोणत्‍या खात्‍यात किती पैसे आहेत, याचा डेटा मिळवायचा. या खात्‍यांच्‍या प्रत्‍येक व्‍यवहारात (अगदी मोबाईलवरून केले जाणारे व्‍यवहारही) त्‍यांची मदत करायची आणि त्‍यांचा विश्‍वास संपादन करायचा. ग्राहकाचा (विशेषत: वृद्ध ग्राहक) विश्‍वास बसला की बँकेतील त्‍यांचे पैसे उडवायचे, अशी पालोदकरची ‘मोडस आपरेंडी’ असल्‍याचे दिसून येत आहे.
ना घरच्‍यांचा, ना बँकेचा, मग पालोदकर कुणाचा…
दरम्‍यान, पालोदकर हा बँकेचा पुर्णवेळ कमर्चारी नसून, तो बँकेने नेमलेल्‍या खासगी कंपनीने एचडीएफसी बँकेसाठी ग्राहक संबंध व्‍यवस्‍थापक म्‍हणून नियुक्‍त केलेला व्‍यक्‍ती असल्‍याचे सांगण्‍यात येत आहे. ज्‍योती जगदाळे यांच्‍या फसवणुकीचे प्रकरण समोर आल्‍यानंतर अमित पालोदकर विषयी माहिती घेण्‍यासाठी पोलिसांनी एचडीएफसी बँकेशी संपर्क साधला होता. त्‍यावेळीही बँकेने पालोदकर हा आपला कमर्चारी नसल्‍याचे पोलिसांना स्‍पष्‍ट केले होते. तर त्‍याच्‍या कुटुंबियांनी अमितच्‍या कृत्‍यांशी आपला संबंध नसल्‍याचे सांगत त्‍याच्‍या कृत्‍यांमुळे आपणच अडचणीत येत असल्‍याचा पवित्रा घेतला होता. आताही या सगळ्‍यांची भूमिका तीच कायम असल्‍याचे वृत्त असून, अशा वेळी पालोदकर याने फसवणूक केलेल्‍या ग्राहकांच्‍या पैशांचे काय होणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
महत्त्‍वाचे म्‍हणजे आपल्‍या बँक खात्‍यात अगदी एक रुपयाचा व्‍यवहार झाला तरी संबंधित बँक आणि तिचा ग्राहक जागरूक होतात. मात्र, या प्रकरणांमध्‍ये अमित पालोदकर त्‍याच्‍या नातेवाईकांच्‍या खात्‍यात लाखो रुपये वळवत असताना कुणाला काहीच पत्ता लागत नव्‍हता आणि त्‍यावर कुणी आक्षेपही घेत नव्‍हते, ही आश्‍चर्यकारक बाब मानली जात आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button