गुन्हे वार्ता

नंदुरबारच्या भरवस्तीत बंद खोलीत रंगला होता झन्नामन्ना जुगाराचा खेळ; एलसीबीने एन्ट्री करीत उधळला डाव, १६ जणांवर गुन्हा

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहराच्या भरवस्तीत असलेल्या नवनाथ नगरात एका बंद खोलीत सुरू असलेला जुगाराचा डाव पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) धाड टाकून उधळला. या प्रकरणात पोलिसांनी १६ जणांवर गुन्हा दाखल केला असून, त्यांच्याकडून एक लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनाथनगर भागात रोकडेश्वर चौकातील एका बंद खोलीत जुगाराचा डाव रंगल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती. यानंतर एलसीबीच्या पथकाने तातडीने संबंधितस्थळी धाव घेतली. यावेळी या ठिकाणी बाबूलाल मंगा चौधरी, प्रशांत सुरेश जाधव, मुकेश नंदलाल चौधरी, राजेश दामू रामो, भावेश रघुनाथ मराठे, लालचंद राजू पवार, राजू भालसिंग वळवी, कैलास उर्फ दुर्गेश अशोक गवळी, राजेश मयलू गवळे, पवन बाळू वानखेडे, गिनेश शरू वाडिले, इम्तियाज मोहम्मद खान, कृष्णा अशोक वाघ, गोकुळ जयराम भोई, स्वप्निल तुमडू भोई, धर्मेश केशव जव्हेरी (सर्व रा. नंदुरबार) हे सर्वजण जुगार खेळताना आढळले.
पोलिसांनी हा जुगाराचा डाव उधळून लावतानाच सर्व जुगार्‍यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस हवालदार सुनील येलवे यांनी फिर्याद दिली. यावेळी या ठिकाणी रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण एक लाख ७१ हजार १२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  सध्या पोलीस उपनिरीक्षक छगन चव्हाण या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button