धक्कादायक : नवापुरात बनावट युरिया कारखान्याचा भंडाफोड; निर्मितीच्या सामग्रीसह लाखोंचा साठा जप्त, राजस्थानी टोळी गजाआड!
नवापूर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शेतीचा हंगाम उंबरठ्यावर असताना नवापूर शहरात भरवस्तीत एका घरात सुरू असलेल्या बनावट युरिया निर्मितीच्या कारखान्याचा पर्दाफाश करण्यात आला आहे. कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या पथकाने केलेल्या या कारवाईत लाखो रुपये किमतीचे बनावट युरिया निर्मितीचे साहित्य जप्त करण्यात आले असून राजस्थानी टोळीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवापूर शहरातील धनलक्ष्मी पार्क येथील एका घरात बनावट युरियाची निर्मिती सुरू असल्याची माहिती खबऱ्यामार्फत जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाला मिळाली होती. त्यानुसार संबंधित विभागाने सापळा रचून मंगळवारी (दि. २८) सायंकाळी ६ वाजता संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी या ठिकाणी युरिया निर्मितीचे साहित्य आणि तयार केलेल्या युरियाचा साठा पाहून कृषी विभागाचे पथक अवाक झाले.
यावेळी छापा मारणाऱ्या पथकाने कुणालाही हलण्याची संधी न देता टेक्निकल ग्रेड युरियाच्या ३६ गोण्या, उमिया कंपनीच्या पीव्हीसी टाक्या, एलसीएम कंपनीचे दोन फिल्टर, याच कंपनीचे चार सिलिंडर, डीईएफ भरलेल्या विविध कंपन्यांच्या २० लिटर क्षमतेच्या ३८ बादल्या, तयार करून १२ टाक्यांमध्ये भरलेले १३ हजार लिटर डीईएफ युरिया आणि एक महिंद्रा कंपनीचे बोलेरो पिकअप वाहन (एमएच ३९ एडी १२०६) असा एकूण २२ लाख ११ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यावेळी गोवर्धनराम भिकाराम चौधरी, टिकमाराम चुनाराम आणि जसराम देवाराम माचरा (सर्व रा. बाडमेर, राजस्थान) या तीन आरोपींनी गल्फ, महिंद्रा, टाटा व भारत बेंझ यासारख्या कंपन्यांशी आणि नाशिकमधील स्टॉकिस्ट श्री शनेश्वर एंटरप्राइजेस यांच्याशी करारनामा केलेला नसताना व इतर कोणतेही पुरावे नसताना डीईएफ युरिया तयार करून तो विक्रीचा परवानाही नसताना शिवाय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्राशिवाय बेकायदेशीररित्या युरिया निर्मिती करून त्याचा साठा केल्याचे आढळून आले. महत्त्वाचे म्हणजे जप्त करण्यात आलेल्या युरिया बॅगवर कोणत्याही उत्पादकाचे नाव आढळले नाही.



