महाराष्ट्र

नवापुरात ‘बर्ड फ्लू रिटर्न्स’ : चिकन खाणाऱ्यांनो सावधान, ‘डायमंड’ मधील पाच मृत कोंबड्यांचे नमुने पॉझिटिव्ह!; युद्ध पातळीवर उपाययोजना सुरू

नवापूर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : चिकन अर्थात कोंबडाप्रेमींसाठी नंदुरबार जिल्ह्याच्या नवापुरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. कधीकाळी देशभरात धुमाकूळ घालणाऱ्या ‘बर्ड फ्लू’ (एच ५ एन १) या विषाणूजन्‍य आजाराने पाच वर्षांनी नवापुरात पुन्हा एन्ट्री केली असून, शहरातील ‘डायमंड पोल्ट्री फार्म’मधील काही कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’ने झाल्याचा अहवाल समोर आला आहे. २००६ व २०२१ नंतर या आजाराने पुन्हा नवापुरात शिरकाव केल्याने परिसरात भीतीचे सावट पसरले असून, प्रशासनाने या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध पातळीवर उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
नवापूर येथील ‘डायमंड पोल्ट्री फार्म’ मध्ये दगावलेल्या कोंबड्यांचे नमुने भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेकडे (एनआयएचएसएडी) तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या तपासणीत पाच कोंबड्यांना ‘बर्ड फ्लू’ झाल्याचे आढळल्याच्‍या वृत्ताला पशुसंवर्धन आयुक्तालयाने पुष्‍टी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवापुरातील ‘डायमंड’, ‘तस्‍लिम’ आणि ‘डॉन’ या पोल्ट्री फार्म येथील प्रत्येकी दोन पक्ष्‍यांचे नमुने पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात येत आहे.
तिसऱ्यांदा शिरकाव, नवापुरातील व्यावसायिक धास्तावले
नवापुरात ‘बर्ड फ्लू’ने घेतलेली ही तिसरी एन्ट्री आहे. याआधी सर्वात प्रथम २००६ मध्ये देशात सर्वात आधी नवापुरात या आजाराचा उद्रेक झाला होता. तापेच्या या साथीच्या आजाराने कोंबड्यांचा पटापट मृत्यू होत असल्याने त्यावेळी नवापुरातील पोल्ट्री व्यवसाय रसातळाला गेला होता. यानंतर संपूर्ण देशाचे लक्ष वेधणाऱ्या ‘बर्ड फ्लू’ने २०२१ मध्ये पुन्हा नवापुरात थैमान घातले होते. त्यावेळीही तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पक्ष्‍यांचे निर्मूलन करावे लागले होते. यानंतर आता पुन्हा एकदा या विषाणूने डोके वर काढल्याने पोल्ट्री व्यावसायिकांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. या विषाणूचा ऐन उन्हाळ्यात प्रादुर्भाव वाढल्याने पोल्ट्री उद्योगाला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
वाहतूक बंदी, निर्मुलन प्रक्रियाही सुरू
‘बर्ड फ्लू’च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा प्रशासनाने ‘पशुसंक्रामक व सांसर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम २००९’ नुसार कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत बाधित क्षेत्रातील पक्ष्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने निर्मूलन करण्याची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. तसेच केंद्र शासनाच्या ॲक्शन प्लॅननुसार बाधित क्षेत्राच्या एक किलोमीटर परिघातील सर्व कुक्कुट पक्षी, अंडी व पशुखाद्याची विल्हेवाट लावण्याचे निर्देश देण्यात आले असून, एक ते दहा कि.मी. परिघातील क्षेत्राला देखरेख क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. शिवाय बाधित क्षेत्रातील कुक्कुट पक्ष्‍यांची वाहतूक, खरेदी-विक्री व बाजारांवर तत्काळ बंदी घालण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. याशिवाय पशुसंवर्धन विभागाची शीघ्र प्रतिसाद पथके (आरआरटी) सध्या घटनास्थळी तैनात करण्यात आली असून, सॅनिटायझेशन व निर्जंतुकीकरण सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, नवापुरातील परिस्थिती सध्या पूर्णपणे नियंत्रणात असून, घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी म्हटले आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button