नंदुरबार जिल्हा

ब्रेकिंग न्‍यूज : ​शहाद्यातील ‘चावरा इंग्लिश स्कूल’च्‍या मान्‍यतेवर गंडांतर; बेकायदेशीर वर्ग, विद्यार्थ्यांच्या छळप्रकरणी शिक्षण विभागाने बजावली नोटीस, खुलाशासाठी तीन दिवसांची मुदत

​शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : शहादा येथील अनेक गैरप्रकारांच्‍या तक्रारीमुळे चर्चेच्‍या केंद्रस्‍थानी आलेल्‍या ‘चावरा इंग्लिश मीडियम स्कूल’ला अखेर शिक्षण विभागाने मोठा दणका दिला आहे. शासनाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन, बेकायदेशीरपणे वर्ग चालवणे आणि विद्यार्थ्यांचा मानसिक छळ करणे अशा गंभीर आरोपांखाली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने शाळेला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली असून, तीन दिवसांत खुलासा करण्‍याचे आदेश शाळा व्‍यवस्‍थापनाला देण्‍यात आले आहेत. खुलासा सादर न केल्यास मान्यता रद्द करण्याचा इशाराही शाळेला देण्यात आला असून, या नोटिशीमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष अनिल भामरे यांनी १५ एप्रिल २०२६ रोजी शाळेविरुद्ध तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत शिक्षण विभागाकडून शहादा पंचायत समितीच्‍या गटशिक्षणाधिकाऱ्यांच्‍या समितीमार्फत शाळेची चौकशी करण्यात आली. २२ एप्रिल रोजी या समितीने आपला अहवाल जि.प. शिक्षण विभागाला सादर केला. या चौकशीत शाळेत अनेक धक्कादायक अनियमितता उघडकीस आल्या होत्‍या. आयसीएसई मंडळाची अधिकृत मान्यता नसताना शाळेत पालकांना फसवून बेकायदेशीरपणे अभ्यासक्रम शिकवला जातो. त्या नावाखाली भरमसाठ फी वसूल केली जाते. शासनाचे स्पष्ट निर्देश असतानाही विशिष्ट दुकानातूनच (चेतना बुक्स व लक्ष गारमेंट) पुस्तके व गणवेश खरेदीसाठी पालकांवर दबाव टाकला जात असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते.
विद्यार्थ्यांचा मानसिक छळ, विद्यार्थिनीशी गैरवर्तन
फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांचा मानसिक छळ केला जात असून, इयत्ता ७ वी मधील एका विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याची गंभीर तक्रार पालकांनी केली आहे. हे प्रकरण पॉक्सो कायद्यांतर्गत येत असल्याचे शाळेला बजावलेल्‍या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. शाळेतील ११० शिक्षकांपैकी ६१ शिक्षकांकडे व्यावसायिक पात्रता नाही, तर ४९ शिक्षक शैक्षणिकदृष्ट्या अपात्र असल्याचे आढळले आहे. हे शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे परिपाठावेळी राष्ट्रगीत व राज्यगीत न घेता, मनमानी पद्धतीने वेळापत्रक राबवून राष्ट्रगीताचा अवमान केल्याचा ठपकाही शाळेवर ठेवण्यात आला आहे. सीसीटीव्ही, सखी सावित्री समिती, तक्रार पेटी आणि कर्मचारी चारित्र्य पडताळणी यांसारख्या विद्यार्थी सुरक्षिततेच्या नियमांकडे शाळेने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. शाळेने पालक – शिक्षक संघाच्या सहमतीशिवाय मनमानी पद्धतीने १५ टक्के फी वाढ करून पालकांची आर्थिक लूट केल्याचेही समोर आले आहे.
या सर्व बाबींची गंभीर दखल घेत, “तुमच्या शाळेची मान्यता का काढून घेण्यात येऊ नये?” असा सवाल शिक्षण विभागाने शाळा व्‍यवस्‍थापनाला विचारला आहे. शाळेला या नोटिशीचे उत्तर देण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. समाधानकारक खुलासा न मिळाल्यास शाळेवर प्रशासकीय कारवाईसह फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button