महाराष्ट्र

श्रवण दत्त एस. यांची अखेर बदली; नंदुरबारच्या पोलीस अधीक्षक पदाची धुरा आता अश्विनी सानप यांच्‍या खांद्यावर!

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यानंतर अपेक्षेनुसार अखेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा नंबर लागला आहे. या अंतर्गत नंदुरबारचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी पुणे येथे लोहमार्ग पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या अश्विनी सानप यांची नियुक्ती झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारने प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका लावला होता. त्याचवेळी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलींचा हंगामही सुरू होण्याचे संकेत मिळाले होते. हे संकेत खरे ठरले असून, राज्य सरकारच्या गृह मंत्रालयाने बुधवारी (दि. ३०) भारतीय आणि राज्य पोलीस सेवेतील २१ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले. यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विविध कारवायांमुळे आणि गुंडगिरी विरोधात घेतलेल्या कडक पावित्र्यामुळे चर्चेत असलेले नंदुरबारचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांचाही समावेश आहे.
श्रवण दत्त एस. यांची आता विशेष कृती दलाचे अपर पोलीस महासंचालक आणि सहायक पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) यांचे स्टाफ ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली आहे. श्रवण दत्त एस. यांच्या जागी पुणे लोहमार्ग विभागाच्या पोलीस अधीक्षक असलेल्या अश्विनी सानप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोणत्याही दबावाला बळी न पडता कडक पवित्रा घेऊन गुंडगिरीचा रिमोट करणाऱ्या अधिकारी अशी सानप यांची ओळख आहे. गेल्या काही दिवसात नंदुरबार शहर आणि जिल्ह्यात गुंडगिरीने पुन्हा डोके वर काढले असून या गुंडांचा आणि दहशत माजवणाऱ्यांचा सुपडा साफ करण्याचे मोठे आव्हान अश्विनी सानप यांच्यासमोर राहणार असल्याची चर्चा आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button