मुख्य बातम्या

बर्ड फ्लूचा फटका : नवापुरात सहा पोल्ट्री फार्ममधील १.४० लाख कोंबड्या मारून टाकणार; एक कि.मी. परिसर सील; संसर्गाचा प्रसार रोखण्‍यासाठी कडक उपाययोजना!

नवापूर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : कोंबड्यांच्‍या जीवावर उठलेल्‍या ‘बर्ड फ्लू’ (एच ५ एन १) या विषाणूजन्‍य आजाराने पाच वर्षांनी नवापुरात पुन्हा एन्ट्री केल्‍याने खळबळ उडाली आहे. ‘बर्ड फ्लू’च्‍या शिरकावामुळे नवापुरात भीतीचे सावट पसरले असून, प्रशासनाने या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध पातळीवर उपाययोजना हाती घेतल्या आहेत. संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी, बाधित परिसराच्या एक किलोमीटर त्रिज्येचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन) म्हणून घोषित करण्यात आला आहे. या परिसरातील सर्व पोल्ट्री फार्मवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
नवापूरमधील एका पोल्ट्री फार्ममधील मोठ्या संख्येने कोंबड्या अचानक मरण पावल्यानंतर, तपासणी करण्यात आली, ज्यात एव्हियन इन्फ्लूएंझाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने संपूर्ण परिसरात सतर्कतेचा इशारा देत तातडीने कारवाई सुरू केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ आणि १४ तारखेला नवापूरमधील एका पोल्ट्री फार्ममध्ये १५० ते २०० कोंबड्या अचानक मरण पावल्या. या असामान्य घटनेनंतर, पशुसंवर्धन विभागाचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले आणि नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. भोपाळच्या प्रयोगशाळेकडून बर्ड फ्लूची लागण झाल्याचा अहवाल येताच प्रशासनाने तातडीने कारवाई सुरू केली.
संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी, बाधित परिसराच्या एक किलोमीटर त्रिज्येतील परिसर प्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन) म्हणून घोषित करण्यात आला आहे. या भागातील सर्व पोल्ट्री फार्मवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. मोठ्या प्रमाणावर कोंबड्या मारण्याची मोहीमही हाती घेण्यात आली असून, अंदाजे सहा पोल्ट्री फार्ममधील सुमारे १,४०,००० कोंबड्या नष्ट केल्या जाणार आहेत.
नवापूरमधील बर्ड फ्लूची ही तिसरी एन्‍ट्री असून, याचा स्थानिक पोल्ट्री उद्योगावर गंभीर परिणाम झाला आहे. अशा घटना सातत्याने समोर येत असल्याने व्यवसायांना मोठे आर्थिक नुकसान होत आहे आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण होत आहे.
तज्ज्ञांच्या मते, बर्ड फ्लू हा एक अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य आजार आहे जो पक्ष्यांमध्ये वेगाने पसरतो. आजवर या आजाराचा संसर्ग मानवाला झाल्‍याचे समोर आले नसले तरी खबरदारीचा उपाय म्हणून लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.  तसेच प्रशासनाने नागरिकांना घाबरून न जाण्याचे, अफवांपासून दूर राहण्याचे आणि कोणतीही संशयास्पद परिस्थिती आढळल्यास तात्काळ संबंधित विभागाला कळवण्याचे आवाहन केले आहे. अधिकाऱ्यांच्या मते, परिस्थिती नियंत्रणात असून सर्व आवश्यक नियमांचे पालन केले जात आहे.
सध्याचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे संसर्ग नवापूरपुरता मर्यादित ठेवणे आणि तो इतर भागांमध्ये पसरण्यापासून रोखणे हे आहे. प्रशासन आणि पशुसंवर्धन विभाग परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button