महाराष्ट्र

देव लागला द्यायला अन्‌ पदर नाही पसरायला, नंदुरबारची अवस्‍था; नर्मदेचे हक्‍काचे १० टीएमसी पाणी उचलायला प्रशासनाला जमलेच नाही, पालकमंत्री म्‍हणाले, पुन्‍हा प्रयत्‍न करू!

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : जिल्‍ह्यात पाणीटंचाई आणि सिंचनाचा प्रश्‍न उबंरठ्यावर येऊन ठेपली असताना नर्मदा नदीवर उबारलेल्‍या सरदार सरोवर प्रकल्‍पातून नंदुरबारच्‍या वाट्याला आलेले तब्‍बल १० टीएमसी पाणी उचलायला जिल्‍हा प्रशासनाला वेळच मिळाला नसल्‍याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. महत्र्‍वाचे म्‍हणजे खुद्द पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीच ही कबुली दिली असून, आता यासाठी जलसंपदा विभागाकडे पुन्‍हा प्रयत्‍न करणार असल्‍याचेही म्‍हटले आहे. पालकमंत्र्यांनी दिलेली ही कबुली म्‍हणजे ‘देव लागला द्यायला अन्‌ पदर नाही पसरायला, अशी नंदुरबारची अवस्‍था असल्‍याची चर्चा सुरू झाली आहे.
महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी (दि. ३० एप्रिल) नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भावनात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, पाणीटंचाई आणि सिंचनाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी जिल्ह्याच्या वाट्याला सरदार सरोवर प्रकल्पातून दहा टीएमसी पाणी आले आहे. मात्र हे पाणी आजवर आपण उचलू शकलो नाही हे वास्तव आहे. परंतु अजूनही वेळ गेलेली नसून नजीकच्या काळात यासंदर्भात जलसंपादन विभागाकडे पाठपुरावा करून नंदुरबार जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जातील. जिल्ह्यात सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जातील. या अनुषंगाने सर्वस्तरीय उपाययोजना करण्यात येणार आहेत, असेही मुश्रीफ म्हणाले.
ठेकेदारी पद्धत बंद करणार
नंदुरबार जिल्हा हा आकांशीच आदिवासी जिल्हा आहे. जिल्ह्यात यापुढे केल्या जाणाऱ्या कामांसाठी ठेकेदारी पद्धत पूर्णतः बंद करण्याचा प्रयत्न राहील. रस्ते विकासाच्या कामात कसूर करणाऱ्या ठेकेदारांना नोटीसा बजावल्या जातील. जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या वर्ग खोऱ्या व इमारत निर्मितीच्या कामांसाठी प्रयत्न केले जातील. एल निनो च्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांना गती देण्याच्या आणि खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेवर खते मिळावीत, याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. युरिया डीएपी वितरणावर प्रशासनाचे लक्ष राहणार असून खत लिंकिंग करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याच्या शासनाच्या आदेशानुसार कार्यवाही केली जाईल, अशी आश्वासनेही यावेळी मुश्रीफ यांनी दिली.
जिल्ह्यात विकास कामे दर्जेदार व्हावीत यासाठी दर महिन्याला नंदुरबारमध्ये येऊन आढावा घेणार असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचीही उपस्थिती होती.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button