गुन्हे वार्ता

कोल्ड्रिंक पडले सव्वा लाखात : दुचाकीच्या डिकीतून १.२० लाखांची रोकड घेऊन अज्ञात चोरटा भुर्र!; अक्कलकुव्यातील भरदुपारची धक्कादायक घटना

अक्कलकुवा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : रस्त्यावर गाडी उभी करून थंड पेय घेण्यासाठी दुकानात गेलेल्या व्यक्तीची नजर चुकून त्याच्या गाडीच्या डिकीत ठेवलेले तब्बल एक लाख वीस हजार रुपये चोरून अज्ञात चोरट्याने धुऊन ठोकल्याची धक्कादायक घटना अक्कलकुवा शहरात घडली. अक्कलकुवा पोलीस सध्या या अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्कलकुवा तालुक्यातील देवमोगरा पुनर्वसन येथील शेतकरी तेजला इस्मा तडवी (५२) हे काही कामानिमित्त गुरुवारी त्यांच्या दुचाकीवरून (एमएच ३९ टी ८७२२) अक्कलकुवा येथे आले होते. यावेळी त्यांनी त्यांच्यासोबत असलेली एक लाख २० हजार रुपयांची रक्कम गाडीच्या डिकीत ठेवली होती. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ते कडक उन्हामुळे तहान लागल्याने सचिन बियर बारच्या बाजूला असलेल्या दुकानात थंडपेय घेण्यासाठी गेले. यावेळी त्यांनी आपली गाडी दुकानासमोर असलेल्या मोकळ्या ठिकाणी लावली होती. यावेळी त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या अज्ञात चोरट्याने कोणाचे लक्ष नाही असे पाहून तडवी यांच्या गाडीच्या डिकीत असलेली रोकड चोरून पोबारा केला.
बराच वेळ वाट पाहूनही अज्ञात चोरटा न दिसल्याने अखेर तडवी यांनी अक्कलकुवा पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदवली. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक फौजदार नूर मोहम्मद पिंजारी या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button