गळ्यात गळा की पुन्हा पायात पाय, शहादा नगर परिषदेत होणार काय ?; १७ एप्रिलच्या वादळी सभेनंतर आता येत्या बुधवारी विशेष सभा!; शहरवासीयांत उत्सुकता

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नगरसेवकांनी केलेल्या मागणीचा मान राखत लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांनी शहादा नगर परिषदेची विशेष सभा येत्या सहा मे रोजी आयोजित केली आहे. अवघ्या वीस दिवसांच्या अंतराने नगर परिषदेची सभा होत असल्याने शहरवासीयांचे डोळे पुन्हा नगर परिषदेकडे लागले आहेत.
१७ एप्रिल रोजी पार पडलेल्या नगर परिषदेची सभा वादळी ठरली होती. नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत ६४ पैकी ५४ विषयांना मंजुरी देताना १० विषय नामंजूर अथवा स्थगित करण्यात आले होते. या सभेचे वातावरण प्रारंभापासूनच वातावरण तापलेले होते. बांधकाम सभापती संतोष वाल्हे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत निषेध नोंदवून नगराध्यक्षांच्या दिशेने काळीपट्टी भिरकावून संताप व्यक्त केला होता. मात्र, नगराध्यक्षांनी शांत व संयमी भूमिका घेत सभेचे कामकाज पुढे सुरू ठेवले होते. अशा या कधी वादळी तर कधी शांततापूर्ण वातावरणात झालेल्या सभेनंतर आता बुधवारच्या विशेष सभेत काय होणार याबाबत स्थानिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
विशेष सभेत शहराच्या विकासासंबंधित विविध महत्त्वाचे मुद्दे मांडले जाण्याची अपेक्षा आहे. पायाभूत सुविधा, रस्त्यांची कामे, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर नागरी सुविधांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र, पालिकेत भारतीय जनता पक्ष व जनता विकास आघाडी असे दोन वेगवेगळे गट कार्यरत आहेत. त्यात नगराध्यक्ष जनता विकास आघाडीचे तर बहुमत व उपनगराध्यक्षपद तसेच विविध समित्या भाजपकडे आहेत. नगरसेवकांच्या आग्रहामुळे आयोजित होत असलेल्या या सभेत वातावरण कसे राहील, याबाबतही तर्कवितर्क लावले जात आहेत.
सभेत वादळी चर्चा होईल की दोन्ही गटाचे नगरसेवक एकत्र येऊन शहराच्या विकासासाठी सामंजस्याने निर्णय घेतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून शहराच्या प्रगतीसाठी ठोस निर्णय घेतले जातील, अशी स्थानिकांना अपेक्षा आहे.
एकंदरीतच, या विशेष सभेकडून शहराच्या भविष्यासाठी सकारात्मक दिशा मिळेल की ती केवळ राजकीय वादविवादांपुरती मर्यादित राहील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे या सभेबाबत शहरात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, या विशेष सभेसाठी नगराध्यक्षांनी पत्रकारांनाही आमंत्रित केले आहे.



