नंदुरबार जिल्हा

नव्‍या पोलीस अधीक्षकांचा भर ‘ट्रिपल एस’वर!; अश्विनी सानप म्‍हणाल्‍या, स्मार्ट, सेंसिटिव्ह आणि स्ट्रिक्‍ट पोलिसिंगच्या माध्यमातून घालणार गुन्हेगारीला आळा!

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसिंग अधिक प्रभावी, उत्तरदायी आणि लोकाभिमुख करण्यासाठी ठोस पावले उचलण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी स्पष्ट केले. स्मार्ट, सेंसिटिव्ह आणि स्ट्रिक्‍ट पोलिसिंग अशा ‘ट्रिपल एस’च्‍या जोरावर जिल्‍ह्यातील गुन्‍हेगारीवर नियंत्रण मिळविण्‍याचा प्रयत्‍न केला जाईल, असे सानप यांनी जोर देऊन सांगितले. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी प्रथमच संवाद साधत जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत आपली भूमिका मांडली.
जिल्ह्याचा विद्यमान क्राइम ट्रेंड बारकाईने अभ्यासून त्यानुसार पोलिसिंगमध्ये आवश्यक बदल केले जातील. समाजाभिमुख व लोकाभिमुख पोलिसिंगला प्राधान्य दिला जाईल, असे सानप म्हणाल्या. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जलद प्रतिसाद व्यवस्था आणि गुप्त माहिती यंत्रणा अधिक बळकट केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कम्युनिटी पोलिसिंगवर विशेष भर
पोलीस व नागरिक यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ करण्यासाठी कम्युनिटी पोलिसिंग प्रभावीपणे राबविण्यात येईल. समाजातील विविध घटकांशी सातत्याने संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेत त्यावर तातडीने उपाययोजना करणे, हा यामागील उद्देश आहे. गावपातळीपासून शहरापर्यंत संवादाचे पूल मजबूत करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
शिस्त प्रथम; पोलिस दल अधिक जबाबदार बनविणार
“डिसिप्लिन हा पोलिस दलाचा कणा आहे,” असे स्पष्ट करत सानप यांनी शिस्तबद्ध आणि पारदर्शक कामकाजासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. प्रत्येक पोलिस अधिकाऱ्याने जबाबदारीची जाणीव ठेवून काम करावे, यासाठी अंतर्गत नियंत्रण प्रणाली अधिक मजबूत केली जाईल, असे त्‍या म्‍हणाल्‍या.
‘दामिनी पथक’ अधिक सक्रिय करणार
महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालय परिसरात ‘दामिनी पथक’ अधिक सक्रिय करण्यात येणार आहे. पेट्रोलिंग वाढवून छेडछाड व गुन्हेगारीवर अंकुश ठेवला जाईल. तसेच, मुलींना व महिलांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम बनविण्यावरही विशेष भर दिला जाणार आहे.
जनजागृतीद्वारे पोलिस-जनता दुवा मजबूत
पोलिस विभागाच्या विविध उपक्रमांची माहिती थेट जनतेपर्यंत पोहोचवून जनजागृती निर्माण केली जाईल. सायबर गुन्हे, महिला सुरक्षा, वाहतूक नियम आदी विषयांवर विशेष मोहिमा राबवून नागरिकांना जागरूक करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह पोलिस विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button