नंदुरबार जिल्हा

‘बर्ड फ्लू’चे साईड इफेक्टस्‌ : नवापुरात चिकन, बिर्याणी, अंडे विक्री बंद; जिल्हाधिकार्‍यांकडून परिस्‍थितीची पाहणी!; आणखी ९२ हजार कोंबड्या, पावणेसात लाख अंडी नष्‍ट

नवापूर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नवापुरात एन्ट्री केलेल्‍या ‘बर्ड फ्लू’ (एच ५ एन १) या विषाणूजन्‍य आजाराचे साईड इफेक्‍टस्‌ सुरू झाले असून, प्रशासनाने शहरातील चिकन, अंडी आणि बिर्याणी विक्रीवर बंदी घातली आहे. ‘बर्ड फ्लू’च्‍या शिरकावानंतर प्रशासनाने हाती घेतलेली कोंबड्या व अंडी नष्‍ट करण्‍याची मोहीम तिसर्‍या दिवशीही सुरूच होती. दरम्‍यान, ‘बर्ड फ्लू’च्‍या उद्रेकानंतर अखेर तिसर्‍या दिवशी जिल्‍हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी नवापूर गाठून तेथील परिस्‍थितीची पाहणी केली.
‘बर्ड फ्लू’मुळे नवापुरात भीतीचे सावट पसरले असून, प्रशासनाने या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध पातळीवर उपाययोजना हाती घेतल्या आहेत. संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी, बाधित परिसराच्या एक किलोमीटर त्रिज्येचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन) म्हणून घोषित करण्यात आला आहे. या परिसरातील सर्व पोल्ट्री फार्मवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. सोबतच ‘बर्ड फ्लू’चा मानवी आरोग्‍यावर परिणाम होऊ नये, यासाठी प्रशासनाने खबरदारीची उपाययोजना म्‍हणून शहरातील चिकन व अंडी विक्री दुकाने बंद ठेवण्‍याचे आदेश दिले आहेत. शिवाय ‘नॉन व्‍हेज’ अन्नपदार्थ विक्रेत्‍या हॉटेलांना चिकन बिर्याणी न विकण्‍याचे आदेश देण्‍यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी मयूर पाटील यांनी दिला आहे.
दरम्‍यान, अचानक लागू केल्‍या गेलेल्‍या या बंदीमुळे स्थानिक लहान चिकन विक्रेत्‍यांना व्‍यवसायाच्‍या चिंतेने ग्रासले आहे. अनेकांचे उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून असल्याने त्‍यांच्‍या भविष्‍यासंदर्भात अनिश्चितता निर्माण झाली आहे.
दुसरीकडे, बाधित क्षेत्राच्‍या एक किलोमीटर परिसरातील सर्व कोंबड्या व त्‍यांच्‍या अंड्यांचे निर्मूलन युद्ध पातळीवर सुरू आहे. गेल्‍या तीन दिवसापांसून सुरू असलेल्‍या या मोहिमेंतर्गत तिसर्‍या दिवशी आणखी ९२ हजार ५११ कोंबड्या आणि ६ लाख ६१ हजार ३०२ अंडी नष्‍ट करण्‍यात आल्‍या. याशिवाय एक हजार ०८७ मेट्रिक टन पशुखाद्यही नष्‍ट करण्‍यात आले. पशुसंवर्धन विभागाचे ५० कर्मचारी व खासगी मजुरांच्‍या मदतीने हे काम सुरू असल्‍याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्‍त संजय खाचणे यांनी दिली.
जिल्‍हाधिकारी पोहोचल्‍या नवापुरात
‘बर्ड फ्‍लू’च्‍या धुमाकुळ घातल्‍यानंतर अखेर तिसर्‍या दिवशी जिल्‍हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी रविवारच्‍या सुटीचा दिवस असूनही नवापूर गाठून बाधित क्षेत्राची पाहणी केली. डॉ. सेठी यांनी शहरातील तीन टेंबा परिसरातील ‘डॉन’ पोल्‍ट्री फार्मला भेट देऊन परिस्‍थितीची पाहणी केली. बाधित पक्षी, अंडी आणि पशुखाद्य नष्‍ट केल्‍यामुळे पोल्‍ट्री फार्म चालकांचे मोठे नुकसान होत असून, या बदल्‍यात त्‍यांना शासनाकडून दिल्‍या आर्थिक मदतीच्‍या प्रक्रियेत ससुसूत्रता ठेवण्‍याच्‍या सूचना त्‍यांनी सहकार्‍यांना दिल्‍या.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button