गुड न्यूज : ‘त्या लाडक्या बहिणींच्या चेहर्यावर सरकार हसू फुलविणार!; पुन्हा पात्रतेची संधी मिळण्याची शक्यता
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेंतर्गत महिन्याला मिळणारे १५०० रुपये बंद झाल्यामुळे नाराज झालेल्या महिलांच्या चेहर्यावर पुन्हा हास्य फुलण्याचे संकेत मिळत आहेत. या योजनेंतर्गत अपात्र ठरलेल्या महिलांना पात्र ठरण्याची पुन्हा संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेंतर्गत राज्यातील पात्र महिलांना राज्य सरकारकडून १५०० रुपये महिना आर्थिक साह्य दिले जाते. राज्यातील अनेक महिलांनी चुकीची माहिती देत तसेच बनावट प्रमाणपत्रे सादर करून या योजनेचा फायदा लाटल्याची माहिती समोर आली होती. यानंतर योजनेच्या सर्व पात्र महिलांना कागदपत्रांची पडताळणी (केवायसी) करून घेण्याचे आदेश दिले होते. या पडताळणीत राज्यात तब्बल ५४ लाख महिला योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र ठरल्या होत्या.
परंतु, यामुळे महिलांमध्ये मोठ्या नाराजी पसरली होती. विशेषत: ग्रामीण भागात अनेक महिलांकडून चुकीच्या नोंदी झाल्याच्या आणि काही ठिकाणी तांत्रिक त्रुटींमुळे अपात्र ठरविण्यात आल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. यातील बहुतांश महिलांनी पुन्हा कागदपत्रांची पडताळणी करण्याची गरज बोलून दाखवली होती.
या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना पारदर्शक व पात्र लाभार्थ्यांपर्यंत मर्यादित ठेवण्यासाठी कागदपत्रांची पडताळणी आवश्यक होती, असे स्पष्ट करीत राज्य सरकारने ही संपूर्ण प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पडल्याचा दावा केला होता. मात्र, आता अपात्र महिलांची नाराजी वाढत असल्याच्या अनुषंगाने राज्य सरकार या अपात्र ठरलेल्या महिलांना अपील करण्याची आणखी एक संधी उपलब्ध करून देण्याचा विचार करीत असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत अद्याप राज्य सरकार पातळीवरून अधिकृतपणे कुणीही काहीही बोलले नसले तरी अपील प्रक्रियेचे स्वरूप काल मर्यादा आणि निकष याबाबत लवकरच राज्य सरकार निर्णय घेण्याची शक्यता आहे, असे प्रशासनातील सूत्रांचे म्हणणे आहे.



