शहाद्यात महावितरणविरोधात भाजप आक्रमक; वीज खंडिततेच्या मुद्यावर संताप, मुद्दा निकाली काढण्यासाठी दिली १५ दिवसांची मुदत, अन्यथा…

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहरात वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे स्थानिक रहिवाशांचे हाल होत असून, त्याचा थेट परिणाम पाणीपुरवठ्यावर होत आहे. एक्सप्रेस वीजपुरवठा सतत बंद राहिल्याने नगर पालिकेच्या पाण्याच्या टाक्या वेळेवर भरल्या जात नाहीत. परिणामी शहरवासीयांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर शहादा नगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी आक्रमक होत थेट महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) कार्यालयात धडक दिली. १५ दिवसांत (दि. १८ मे) हा मुद्दा निकाली न काढल्यास मोठे आंदोलन उभारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
शहरातील भाजप नगरसेवकांनी शहादा येथील महावितरण कार्यालयात जाऊन कार्यकारी अभियंता यू. के. प्रसाद, सहायक अभियंता ए. टी. पाटील व पुष्पेंद्र पाडवी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली. यावेळी वारंवार वीज खंडित होणे, तक्रारी करूनही कर्मचारी फोन न उचलणे आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष अशा विविध मुद्द्यांवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. जनतेला आम्ही काय उत्तर द्यायचे, असा सवाल करीत नगरसेवकांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी वीज पुरवठा नियमित आणि अखंडित ठेवण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावर महावितरणच्या अधिकार्यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
या बैठकीस उपनगराध्यक्ष माधवी पाटील, ज्ञानेश्वर चौधरी, सुनील काशिनाथ पाटील, ललित छाजड, यशवंत पाटील, डॉ. कदम, निलेश पाटील, एकनाथ नाईक, भाऊ हरीश पाटील, मुनेश जगदेव, सागर मराठे या नगरसेवकांसह भाजप पदाधिकारी अजब सिंग गिरासे, गणेश पाटील, विकी ठाकरे, रमाशंकर माळी तसेच नगरपालिका पाणीपुरवठा अभियंता प्रकाश जावरे उपस्थित होते.



