नंदुरबार शहर

राज्‍यातील पहिली पाणीकपात नंदुरबारमध्‍ये : आता मिळणार दोन दिवसाआड पाणी; ‘विरचक’ची पातळी घटल्‍याचा परिणाम; नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांची घोषणा

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : सूर्य आग ओकत असताना राज्‍यातील धरणांतील पाण्‍याची पातळी झपाट्याने घसरत चालली असून, याचा सर्वांत पहिला फटका नंदुरबार शहराला बसला आहे. वाढत्या तापमानासह शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणातील पाणीसाठा घटत चालल्याने नंदुरबार शहराला येत्‍य १० मेपासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी सोमवारी (दि. ४) ही घोषणा केली. आगामी काळात संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी हा निर्णय पालिकेने घेतल्याचे त्यांनी सांगितले.
नंदुरबार नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा संपल्यानंतर नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. गेल्या महिनाभरात शहरासह परिसरात तापमानात मोठी वाढ झाली असून, यंदा तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. या उष्णतेचा थेट परिणाम पाणीपुरवठा व्यवस्थेवर होत असल्याचे त्यांनी सांगितले.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या झराळी येथील विरचक प्रकल्पातील पाणीसाठा बाष्पीभवनामुळे दिवसेंदिवस कमी होत आहे. पावसाळा जूनपर्यंत अपेक्षित नसल्याने उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी हा उपाय करण्यात येत आहे, असे रघुवंशी यांनी सांगितले.
नगराध्यक्षा रघुवंशी यांनी नंदुरबारकरांना पाण्याचा अपव्यय टाळून काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले. यासोबतच उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, मुख्याधिकारी राहुल वाघ आणि पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील यांनीही शहरवासीयांना पालिकेला सहकार्य करण्‍याचे आवाहन केले. दरम्यान, पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी नगरपरिषदेच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button