खतरनाक : मानसिक आजारी व्यक्तीला सिमेंटच्या खांबाला दोराने बांधून ठेचले!;, जागीच मृत्यू, अक्कलकुव्यातील खुनाच्या घटनेने खळबळ
अक्कलकुवा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : घरात घुसून महिलेला मारहाण केल्याच्या रागातून मानसिक आजारी व्यक्तीला संबंधित कुटुंबातील चौघांनी सिमेंटच्या खांबाला बांधून जबर मारहाण करीत त्याचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना अक्कलकुवा तालुक्यातील डाबचा जांभीपाणीपाडा येथे घडली. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली असून, फरार झालेल्या उर्वरित तिघांचा मोलगी पोलीस शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्र हात्या वसावे (४४, रा. मोलगीचा सोराचा पाडा, ता. अक्कलकुवा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी लिलाबाई सायसिंग वसावे (५४) यांच्या तक्रारीवरून बामण्या पाश्या राऊत, गिलीबाई बामण्या राऊत, दिनेश बामण्या राऊत व सुरती बामण्या राऊत (सर्व रा. डाबचा जांभीपाणीपाडा) या चौघां विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
३० एप्रिल रोजी भल्या पहाटे महेंद्र वसावे हा बामण्या राऊत यांच्या घरात घुसला होता. डोक्यावर परिणाम झाला असल्याने त्याने घरात प्रवेश केल्यानंतर गिलीबाई राऊत हिला मारहाण केली. यावेळी गिलीबाईने आरडाओरड केल्याने घरातील सर्वांना जाग आली. याचदरम्यान गिलीबाईला मारहाण करून महेंद्र पळून जाण्याच्या तयारीत असतानाच घरातील सर्वांनी त्याला पकडून ठेवले.
यानंतर त्याला घरातच दोराच्या साह्याने सिमेंटच्या खांबाला बांधून ठेवण्यात आले. पुढे चारही आरोपींनी त्याला काठ्या तसेच लाथाबुक्क्यांनी तुफान मारहाण केली. यामुळे महेंद्र रक्तबंबाळ झाला आणि वर्मी घाव बसल्याने काही वेळातच त्याने प्राण त्याग केला.
ही घटना माहिती झाल्यानंतर लिलाबाईने मोलगी पोलीस ठाणे गाठून संबंधितांविरोधात फिर्याद नोंदवली. मोलगी पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि बामण्या राऊत याला ताब्यात घेतले. तोपर्यंत इतर तीन आरोपी फरार झाले होते. पोलीस आता या तिघांचा शोध घेत आहेत.



