मुख्य बातम्या

तामिळनाडूचा ‘धुरंधर’! : ना राजकारण, ना प्रशासनाचा अनुभव, तरी पठ्ठ्या आता थेट होणार मुख्‍यमंत्री!, विजय जोसेफच्‍या यशाने सारेच अचंबित

चेन्नई (वृत्तसंस्‍था / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : दोन अक्षांमध्ये विभागल्या गेलेल्या द्रविडी राजकारणाचे चक्र सोमवारी (दि. ४) भेदले गेले. वर्षानुवर्षे त्याच त्या चेहऱ्यांना कंटाळलेल्या तमिळनाडूच्या जनतेने थलापती विजय अर्थात विजय जोसेफ यांच्या पदरात मतांचे भरभरून दान टाकत यांना थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत नेऊन ठेवले आहे. राजकारण आणि प्रशासनाचा कोणताही अनुभव नसताना विजय जोसेफ आता थेट तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची शक्यता आहे.
तामिळनाडूचे राजकारण म्हणजे द्रविड मुन्यत्र कळघम (डीएमके) आणि ऑल इंडिया द्रविड मुन्यत्र कळघम (एआयडीएमके) या दोन पक्षांशिवाय आजवर कधीही पूर्ण होत नव्हते. कधी डीएमके तर कधी एआयडीएमके हे दोनच पक्ष या राज्यात आलटून पालटून सत्तेवर राहायचे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मात्र या सत्ताकारणाला राज्यातील जनतेने छेद दिला. तामिळनाडूचा हा निकाल केवळ प्रस्थापितांच्या विरोधात नव्हे तर त्या त्या चेहऱ्यांना कंटाळलेल्या जनतेचा कौल मानला जातो. शिवाय प्रस्थापित नेत्यांवर सातत्याने होणारे भ्रष्टाचाराचे आरोप आणि त्या उलट विजय यांची पूर्णतः कोरी असलेली पाटी अशा लढाईत विजय यांनी यश मिळवण्याचा चमत्कार घडवून आणला आहे.
अभिनेते विजय जोसेफ यांच्या ‘तामिळगा वेत्री कळघम’ या पक्षाला यंदा तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व असे यश मिळाले आहे. विजय यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या या पक्षाने १०७ जागा मिळवून कमाल केली आहे. या पक्षाला राज्यात सर्वाधिक जागा मिळाल्याने आता विजय हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी शक्यता जवळपास निश्चित मानली जात आहे.
विजय यांचे वडील एस.ए. चंद्रशेखर हे चित्रपट दिग्दर्शक आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांनीही राजकारणात उतरून पक्ष आणि संघटना बांधण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. राजकारणात अपयशी ठरलेल्या चंद्रशेखर यांच्या पुत्राने मात्र भल्याभल्या नेत्यांना चारी मुंड्या चित करीत तमिळनाडूच्या राजकारणातील नवा धुरंधर होण्याचा मान पटकावला आहे. विजय यांच्या पक्षाला मिळालेल्या यशानंतर त्यांचे वडील एस.ए. चंद्रशेखर यांनी विजयच राज्याचे पुढील मुख्यमंत्री असतील अशी घोषणाही करून टाकली आहे. अर्थात आता ज्या जनतेने विजय यांना सत्तेच्या खुर्ची जवळ नेऊन बसवले, त्‍यांच्‍या अपेक्षा पूर्ण करण्याची मोठी जबाबदारी विजय यांच्यावर येऊन ठेपली आहे.
तामिळनाडूच्या राजकारणावर चित्रपट कलावंतांचा प्रभाव
दक्षिण भारतातील प्रमुख राज्य असलेल्या तामिळनाडूमध्ये चित्रपट कलावंत असणे ही जणू राजकारण प्रवेशाची पहिली पायरीच मानली जाते. याच मालिकेत सर्वात आधी एम.जी. रामचंद्रन (एमजीआर) यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले. यानंतर त्यांच्याच सहकारी राहिलेल्या जे. जयललिता यांनीही तोच कित्ता गिरवत मुख्यमंत्रीपद पटकावले होते. त्यांचे प्रतिस्पर्धी राहिलेले एम. करुणानिधी प्रत्यक्षात चित्रपट कलावंत नसले तरी त्यांचा चित्रपटसृष्टीशी संबंध होता. यातूनच ते पुढे प्रदीर्घकाळ राज्याचे मुख्यमंत्री राहिले. काही वर्षांपूर्वी प्रख्यात अभिनेते कमला हसन यांनीही राजकीय पक्षाची स्थापना करून सत्तेच्या दिशेने पाऊल टाकले. मात्र, अद्याप त्यांना फारसे यश मिळालेले नाही. याशिवाय दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मोठे नाव असलेल्या थलैवा अर्थात रजनीकांत यांनीही राजकारणात पाय रोवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही अद्याप पुरेसे यश प्राप्त झालेले नाही. हे बडे अभिनेते राजकारणात चाचपडत असताना विजय जोसेफ यांनी मात्र पहिल्याच फटक्यात थेट सत्तेच्या जवळ पोहोचण्याचा चमत्कार घडविला आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button